मीरा भाईंदर प्रतिनिधी | काँग्रेसचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा भाऊ समाजसेवक सय्यद मूनव्वर हुसेन यांनी व त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
मिरा भाईंदर मधील मुझफ्फर हुसेन हे काँग्रेसचे जुने जाणते नेते असून ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत. तसेच आता एक महिन्यापूर्वीच काँगेस पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्षावाढीसाठी त्यांना महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष बनवले आहे. परंतु त्यांचे सख्खे भाऊ यांनी काँगेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरुवात झाली आहे. मिरा भाईंदरमध्ये नयानगर भागत हुसेन यांचे वर्चस्व आहे. मिरा भाईंदर शहरात हुसेन यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. यापूर्वी काँगेसचे नगरसेवक नरेश पाटील, नगरसेविका सारा अक्रम यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश घेण्यासाठी लाईन लागलेली आहे. आणखी काही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. मिरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांना विधानसभेच्या निवडणुकीत याचा नक्कीच फायदा होईल.
देशात व मिरा भाईंदरमध्ये होत असलेला विकासाची कामे पाहून अनेक मान्यवर भाजपात प्रवेश करत आहेत.आज माझ्या कामावर विश्वास ठेवून व शहराचा होत असलेला विकास यामुळे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचे बंधू यांनी माझ्या कामावर व पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे असे आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.