फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द; काँग्रेसचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपचं पाप असून फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द आहेत अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाला ४ महिन्यांत आरक्षण देईन अन्यथा राजकारणाचा संन्यास घेईन, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा देत आहेत. मात्र, याच फडणवीसांनी धनगर समाजाला सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले असा सवाल सचिन सावंत यांनी केला.

तसेच सत्ता मिळाल्यावर चार महिन्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवेन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे सर्वोच्च न्यायालयापेक्षाही अधिक शक्तीशाली झाले आहेत का?, असा सवाल करत सत्ता मिळवण्यासाठी बेफाम आश्वासन द्यायची आणि नंतर त्या आश्वासनांना वाटाण्याच्या अक्षता लावायच्या ही फडणवीसांची कार्यपद्धती आहे अशी टीकाही सचिन सावंत यांनी केली