हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवी मुंबईतील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “मी आजही मुख्यमंत्री आहे हेच जनतेने मला जाणवून दिलं आहे,” असे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. “फडणवीसांना सरकार हातातून जात आहे असे वाटल्याने त्यांनी यापूर्वी पहाटेचा शपथविधीचा प्रयोग करून पाहिला. मात्र, त्यावेळीही त्यांना काही साध्य झाले नाही. आता दोन वर्षानंतरही त्यांचा सत्तेचा मोह सुटत नसल्याचे दिसते, असा टोला लोंढेंनी लगावला आहे.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते लोंढे म्हणाले की, फडणवीस यांनी पहाटेचा प्रयोग केल्यानंतरही सतत ‘मी पुन्हा येईन’ ‘मी पुन्हा येईन’, असा घोषा लावत बसले पण पुन्हा काही संधी मिळाली नाही. महाविकास आघाडीचे सरकार आज पडणार, उद्या पडणार, या तारखेला पडणार, चार दिवसानंतर पडणार अशा ज्योतिषाच्या तारखा सांगूनही झाल्या. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही जात नाही, उलट ते आजही भक्कम आहे.
राज्यातील भक्कम असलेले महाविकास आघाडीचे सरकार अजूनही टिकून आहे. पण फडणवीसांना मात्र शेखचिल्लीसारखे आजही स्वप्नरंजनातच मग्न होण्यात जास्त रस दिसत आहे. भाजप सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत असल्याचे लोंढे यांनी म्हंटले आहे.