कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूरनंतर हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोली गावातील ८ कोरोनाबाधित रूग्ण आता कोरोनामुक्त झाले असून, त्यांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. एकाच दिवशी ८ रूग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याने, म्हासोलीकरांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.
कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूर येथील कोरोनाग्रस्तांची साखळी आटोक्यात आल्याचे चित्र निर्माण होत असतानाच, दहा-बारा दिवसांपूर्वी म्हासोली येथे नव्याने कोरोना साखळी निर्माण झाल्याने तालुका पुन्हा हादरून गेला. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची झपाट्याने वाढ होऊ लागल्याने म्हासोली अल्पावधीत हॉटस्पॉट बनले. १८ व १९ मे रोजी म्हासोली येथील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या निकट सहवासातील ५० वर्षीय पुरूष, १८ वर्षीय युवक, १६ वर्षीय मुलगा, १७ वर्षीय मुलगा, ६२ वर्षीय वृद्ध गृहस्थ, ४८ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष व ३५ वर्षीय महिला अशा एकूण ८ रूग्णांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या सर्वांच्या स्वॅबची तपासणी केली असता, सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
या कोरोनाग्रस्त रूग्णांवर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सकडून यशस्वी उपचार करण्यात आले. तसेच नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे हे आठही रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज या रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमध्ये एकूण ६८ रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.