नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णावाढीच्या दरात मोठी घसरण झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात महिन्याभरापूर्वी लॉकडाउन जाहीर केला, त्यावेळी देशभरात करोना रुग्णांची संख्या केवळ ५०० इतकी होती. मात्र, ही संख्या पुढे वाढत जाईल यांचे संकेत तेव्हाच मिळत होते. त्यानुसार, २४ मार्च या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची दिवसाला सरासरी वाढ २१.६ टक्के इतकी नोंदवण्यात आली होती. मात्र आता ही वाढ ८.१ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. २४ मार्चची वाढीची गती कायम राहिली असती तर, आतापर्यंत देशभरात रुग्णांची संख्या २ लाखापेक्षा अधिक झाला असता.
मात्र, असे असले तरी लॉकडाउन सुरू झाल्यानंतर ५ आठवड्यात असलेला देशातील रुग्णवाढीचा ८.१ टक्के हा दर इतर देशांच्या तुलनेत जास्तच आहे. लॉकडाउननंतर जर्मनीतील रुग्णवाढीचा दर २ टक्क्यांवर खाली आला, तर अमेरिकेत तो ४.८ टक्क्यांनी खाली आला. भारतातील रुग्णवाढीचा दर ८.१ टक्के इतकाच कायम राहिल्यास पुढील आठवड्याच्या शेवटी देशातील रुग्णांची संख्या ४० हजार इतकी होईल. हीच संख्या पुढील १५ दिवसांमध्ये ७० हजाराचा टप्पा गाठेल. तर मे महिन्याच्या अखेरीस ही संख्या २.५ लाखांवर जाऊन पोहोचेल. मात्र, जर या काळात अधिक चांगले प्रयन्त केल्यास रुग्ण वाढीच्या दारात आणखी घसरण होऊन संभाव्य परिस्थिती टाळता येऊ शकते.
दरम्यान, विविध राज्यांनी रुग्णांच्या वाढीचा दर आटोक्यात ठेवला आहे. केरळ राज्याने रुग्णवाढीचा दर १.८ टक्क्यांवर आणला. हा दर जर्मनीपेक्षा कमी आहे. तर, येत्या काही दिवसात भारताची सरासरी रुग्णवाढीची टक्केवारी खाली घसरू शकते. भारतातील रुग्णवाढीतील छोटीशी घसरणही एकूण संख्येच्या दृष्टीने फार महत्त्वाची ठरणार आहे. उदाहरणार्थ, महिन्याने जर भारताने रुग्णलाढ ६ टक्क्यांनी खाली आणली, तर भारतातील रुग्णसंख्या १.३ लाखांपर्यंत राहील, आणि हा दर ५ टक्क्यांवर आला तर भारतातील रुग्णांची संख्या १ लाखाचा आकडा ओलांडू शकणार नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”