हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात आता याची झळ सर्वोच्च न्यायालयालाही बसली आहे. सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता इथून पुढच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून घरुनच केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण परिसर आणि कोर्ट रुम सॅनिटाईज करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व ठरलेल्या प्रकरणांवरील सुनावणी एक तास उशिराने होणार आहे. “माझ्या अनेक कर्मचार्यांना आणि लिपिकांना कोरोनाची लागण झाली आहे. काही न्यायाधीशांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते बरे झाले आहेत. ”
देशात कोरोनाचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल 1,35,27,717 वर गेला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाचा सर्वोच्च न्यायालयाला मोठा फटका बसला आहे.
देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (12 एप्रिल) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,68,912 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 904 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,35,27,717 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे.