सोलापूर | दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना संसर्गावर मात केलेल्या पंढरपूर येथील 90 वर्षाच्या दमयंती भिंगे यांनी समुद्र सपाटी पासून सुमारे 3 हजार 50 फूट उंचीवर असलेला कोराईगड सर केला. कोरोनाच्या नकारात्मकतेच्या काळात या आजीने सकारात्मकतेची उर्जा दिली आहे.
वयाची नव्वदी अोलांडलेल्या पंढरपूरच्या भिंगे आजींना काही दिवसा पूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावर त्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार व संतुलीत आहार घेतला. सोबत प्राणायम देखील केला.
वयाची नव्वदी अोंलांडलेल्या दमयंती भिंगे यांना कोणताही आजार नव्हता. ना ब्लड प्रेशर, ना डायबिटीस. घरकामात कायम व्यस्त असणाऱ्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या आजींना काही दिवसांपूर्वी कोरोनाने गाठले. घरची सारी मंडळी घाबरून गेली. परंतु आलेल्या संकटाला धैर्याने तोंड द्यायचे असा स्वभाव असलेल्या आजी बिलकूल घाबरल्या नाहीत. उलट आपल्याला काही होणार नाही, आयुष्यात अशा अनेक संकटांना धैर्याने तोंड देत आले आहे. कोरोनावर नक्कीच विजय मिळविन असं सांगून त्यांनीच घरातील लोकांना धीर दिला.
डाॅक्टरांच्या सल्ल्याने आजींना पंढरपुरातील हाॅस्पिटल मध्ये अॅडमीट करण्यात आले. आठ ते दहा दिवसांच्या योग्य उपचारानंतर त्यांना घरी आणले. कोरोनावर मात केल्यानंतर या आजी दोन महिन्यांनी चक्क नातवंडांसह लोणावळा येथे फिरायल्या गेल्या. नातवंडांनी जवळच असलेला कोराईगड चढण्याचा प्लॅन केला. आजीला गड चढता येणार नाही या विचाराने त्यांचा नातू अभिजीत उर्फ भैय्या याने आजी आम्ही कोराईगडावर जाणार आहे. तूला गड चढायला येणार नाही तू येऊ नको असे सांगितले. परंतु आजी कुठल्या एेकतात. त्या म्हणाल्या, पोरांनो मला काही त्रास होत नाही, मी पण तुमच्या सोबत गडावर येणार आणि मग नातवंडांचा नाईलाज झाला.
उत्साही आजीला सोबत घेऊन नातवंडांनी गड काबीज करायचे ठरवले आणि विशेष म्हणजे कोरोनाच्या आजारातून बाहेर आलेल्या आजींनी नातवंडांच्या समवेत झपझप पावले टाकत मोठ्या जिद्दीने गड सर केला. सध्याच्या परिस्थितीत भिंगे आजींची ही गड चढाई इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा