कोरोना | माध्यमांनी ‘मोठा’ आणि लोकांच्या वागण्याने ‘भयानक’ केलेला विषाणू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

थर्ड अँगल | कोरोनाला आपण अवास्तव महत्व दिल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे. निरंजन घाटे हे त्यातीलच एक नाव. भारतासारख्या देशात कोरोनापेक्षा गंभीर आजार आहेत. पण त्याच्या जागरुकतेबाबत कधी एवढं गांभीर्य दाखवलं जात नाही असं घाटे यांचं म्हणणं आहे. शिस्त ही फक्त लॉकडाऊनमध्ये पाळायची गोष्ट नाही, ती सातत्यपूर्ण अंगी बनवण्याची गोष्ट असल्याचं घाटे सर परखडपणे मांडतात. सध्या कोरोनाव्हायरसच्या एकूण वातावरणात एक अनुभवी विज्ञान अभ्यासक आणि लेखक म्हणून निरंजन घाटे यांच्या मनात काय विचार आहेत, हे वाचकांपर्यंत पोहचवत आहोत.

कोरोनाच्या पलीकडचं ‘आपलं रोजचं जग काय सांगतं?’ सध्या जगात कोरोना विषाणूजन्य रोगाची साथ पसरली आहे. त्यासंबंधीच्या बातम्या ज्या पद्धतीने दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरून देण्यात येत आहेत त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरत चालले आहे. त्यामुळे इथे वृत्तपत्र वितरणावर बंदी घातली जाण्याच्या आधी वृत्तपत्रांमधून आलेली आकडेवारी देत आहे. भारतात दरवर्षी ४ लाख लोक विविध प्रकारच्या कर्करोगांना बळी पडतात; तर दरवर्षी ८ लाख लोक क्षयरोगाचे बळी ठरतात. जगात दरवर्षी हिपॅटायटीस-सी या व्याधीची १७ कोटी लोकांना लागण होते आणि साडेतीन कोटी लोक ह्या व्याधीला बळी पडतात. इबोलाने आफ्रिकेत थैमान मांडले तेव्हा मृतांची संख्या ६० लाखांहून अधिक होती. सध्या कोरोनाने मरणाऱ्या लोकांत कॉकेशियन वंशाच्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. याचे कारण जी मानवी शाखा युरोपमध्ये गेली ती परिस्थिनुरूप बदलली. गोरा वर्ण, तांबडे केस ही त्यांची वैशिष्ट्ये ठरली. त्यांनी वेळोवेळी इतर वर्णांच्या लोकांना युरोपमध्ये येण्यापासून रोखले. ज्यूंना त्रास दिला. पंधराव्या शतकात स्पेनमधून मूरिश (इस्लामी) आणि ज्यूंना वेचून हाकलून दिले. त्यामुळे तिथले जननिक आदानप्रदान थांबले. चीनमध्येही तेच घडले. पंधराव्या शतकानंतर चीनने जगाशी संपर्क बंद केला. त्याआधीही चीनी लोकांचा जगाशी संपर्क नव्हताच. त्यामुळे चीनमध्येही जननिक आदानप्रदान नव्हते. त्यामुळे त्यांच्यात ही रोगप्रतिकारशक्ती मर्यादित प्रमाणात राहिली. जगात इतरत्र त्या मानाने मोठ्या प्रमाणात जननिक आदानप्रदान म्हणजे रोटीबेटी व्यवहार होत राहिले. माया संस्कृतीचा नाश अशाचप्रकारे जगाशी फटकून राहिल्यामुळे झाला, असे मानवशास्त्रज्ञ म्हणतात. 

हे वास्तव कोण लक्षात घेणार ? – सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा एखाद्या भूभागातील ४० ते ५० टक्के लोकांना त्या रोगाची बाधा होते. त्यातील २ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. त्यामुळे ८० टक्केपेक्षा थोडे जास्तच रुग्ण हे सहा वर्षाखालील किंवा साठ वर्षावरील असतात. एकूण मृतांचे सरासरी वय हे सत्तर वर्षांपेक्षा थोडे जास्तच असते. या सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर साडेसात अब्ज लोकसंख्येत २ लाख जणांचा मृत्यू ह्याची टक्केवारी किती? भारताची लोकसंख्या १ अब्ज ३० कोटी असावी. त्यात २००० मृत्यू सुद्धा झालेले नाहीत. दहा हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. ‘पुण्यात आज दोन मृत्यू’ अशी ब्रेकिंग न्यूज देताना पुण्यात एकूण मृत्यू किती याचे आकडे कधीच सांगितले जात नाहीत. भारतात एकूण कोरोना बाधितांमध्ये या कोरोना बाधितांचा आर्थिक स्तर कधी सांगितला जात नाही. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री हात जोडून सामाजिक अंतर पाळा, चेहऱ्यावर आवरण असल्याशिवाय बाहेर पडू नका, उगीचच कामाशिवाय बाहेर पडू नका असे सांगत असतांना जे तथाकथित सुशिक्षित घराबाहेर पडतात, त्यांना पकडून महिनाभर विलगीकरण कक्षात टाकायला हवे, आणि मोठ्या रकमेचा दंड करावा इतकी चीड आता या लोकांनी आणली आहे. लॉकडाऊन वाढवून काही साध्य होईल का? हाही प्रश्न आहेच. कारण लॉकडाऊन उठल्यावर मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येतील आणि कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिल्यावर कुत्रे जसे उलटून चावते, तशी परिस्थिती होईल. 

रोग पसरण्यामागचं विज्ञान, त्यावरील तत्कालीन प्रतिक्रिया आणि पूर्वानुभव – इथे आणखी एक गोष्टही महत्वाची आहे, ती म्हणजे ‘हर्ड इम्युनिटी’. ही दोन प्रकारची असते. जननिक प्रतिक्षमता आणि जातीय प्रतिक्षमता म्हणजे जेनेटिक इम्युनिटी आणि स्पेसीज इम्युनिटी. इम्युनिटी सिस्टिमला पारिभाषिक शब्द प्रतिक्षमता प्रणाली असा आहे. हर्ड इम्यूनिटीला आपण सार्वजनिक प्रतिक्षमता म्हणजे रोगप्रतिकारक्षमता असे म्हणू शकतो. जेनेटिक म्हणजे जननिक प्रतिक्षमता ही अनुवंशिक असते. प्रत्येक प्राण्याला त्याच्या आईवडिलांकडून ती प्राप्त होते. कुठलीही व्यक्ती ही सर्व रोगांशी लढू शकत नाही. अनुवंशिकतेमुळे तिला काही रोगजंतूंशी सामना करता येतो. इतर रोगजंतू विरुद्धची प्रतिक्षमता तिला स्वतःच मिळवावी लागते. प्राणिजातीची म्हणजे ‘स्पेसीज हर्ड इम्युनिटी’ म्हणजे एखाद्या प्राणिजातीची प्रतिक्षमता. कुठल्याही प्राणी जातीतील सर्वच प्राण्यांमध्ये एखाद्या रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता असत नाही तर त्या प्राण्यांपैकी ५० ते ६० टक्के प्राण्यातच ती असते. हे असे का आणि ह्या प्रतिक्षमतेची साथीच्या रोगाविरुद्ध लढण्यात कशी मदत होते, हे कोडेच आहे. ते सुटेल असा ह्या क्षेत्रातील संशोधकांना विश्वास वाटतो. आपण साथीचे रोग पसरविणाऱ्या अनेक सूक्ष्मजीवांवर काही प्रमाणात मात केली, तरी हिवताप, क्षय आणि अल्सर या सूक्ष्मजीवांनी आपल्या प्रयत्नांना दाद दिलेली नाही. कुष्ठरोगावरही आपण मात करू शकलेलो नाही. विषाणूजन्य आजारांना तर आपण आळा घालू शकत नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. हेलिकोबॅक्टर पायलोरी ह्या रोगजंतूमुळे अल्सर होतो. सुमारे दीड लाख वर्षांपासून म्हणजे आपली मानवजात अस्तित्त्वात यायच्या आधीपासून अल्सर आपल्या पूर्वजांना सतावत आला आहे. हिवताप गेली किमान दहा हजार वर्षे माणसाला छळतो आहे. माणूस सुमारे १ लाख तीस हजार वर्षांपूर्वी कातडी गुंडाळून अंग झाकू लागला ही बाब पिसू आणि माणसाचा जननिक अभ्यास करून मानवशास्त्रज्ञांनी शोधून काढली. हे कसे शक्य झाले? परोपजीवी मग ते कीटक असोत सूक्ष्मजीव असोत किंवा विषाणू असोत त्यांच्यात आणि माणसामध्ये डीएनए आणि आरएनए रेणूंची देवाणघेवाण होते. माणसातील सहाव्या गुणसूत्रावरील प्रथिन रेणूंचा अभ्यास करून हे स्पष्ट होते. मानवी उत्क्रांतीला ह्या देवाणघेवाणीचा हातभार लागला, असेही मानव शास्त्रज्ञ म्हणतात. हिवतापाचे आणि मानवाचे साहचर्य असेच शोधून काढण्यात आले. हिवतापाचे संक्रमण कसे होते हे शोधून काढले गेले त्याला शंभराहून अधिक वर्षे होऊन गेली.

आजही भारतात आणि अमेरिकेतसुद्धा हिवतापाने मरणाऱ्यांची संख्या काही लाखात आहे. विषाणूजन्य आजारात फ्लूने वेळोवेळी थैमान घातले आहे. स्पॅनिश फ्लूने १९१८ साली दीड ते दोन कोटी लोकांना यमसदनात पाठवले. १९५७ च्या साथीनेही जगभर १ कोटीहून अधिक बळी घेतले. तेव्हा ‘ब्रेकिंग न्यूज’ हा प्रकार नसल्यामुळे फारसा गाजावाजा न होता, त्या आल्या आणि गेल्या. हे सगळे अशासाठी सांगितले की जिवाणू, विषाणू, कीटक आणि इतरही जीवांवर आपण कधीच पूर्णपणे मात करू शकलेलो नाही. यातले बरेच परोपजीवी हे सतत उत्परिवर्तित होत असतात. प्रतिजैविकांना दाद न देणारे सूक्ष्मजीव आणि विषाणू बरेच आहेत तर डीडीटी आणि इतर कीटक नाशकांना पचवणाऱ्या कीटकांची संख्याही कमी नाही, हे लक्षात घ्यायला हवे. एखाद्या प्राणिजातीची संख्या जेवढी जास्त तेवढा या परोपजीवींना उत्परिवर्तित व्हायला वाव अधिक. त्यामुळेच माणसाला बाधणाऱ्या रोगकारकांचे प्रमाणही जास्त. कोरोनाचे आत्ताच उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊन दहा प्रकार झाले आहेत. कुठल्यातरी वाहिनीने त्यांना ब्रेकिंग न्यूजमध्ये ‘कोरोनाचे दशावतार’ असे म्हंटले. हे अवतार आणखीही वाढू शकतात हे लक्षात घ्यायला हवे. तसेच हे लक्षात ठेवून कोरोनाच्या साथीला तोंड द्यायला हवे. 

रोखठोक | हे कटू असलं तरी सत्यच आहे – जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढून एकूण मानवी लोकसंख्येच्या सुमारे ३५% झाली आहे. मीही त्यातलाच. यातले ६० टक्क्याहून अधिक लोक एकतर अकार्यक्षम आहेत; किंवा कसलाही उद्योग नसलेले आहेत. त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा भार दुसऱ्यावर असतो. दुसऱ्या टोकाला अज्ञान वयाच्या आणि कायद्याने सज्ञान पण बेकार अशा व्यक्तींची संख्याही ३५% एवढी आहे. साथीच्या रोगांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि सहा वर्षाखालील मुले मरण्याचे प्रमाण सुमारे ८० ते ८५% एवढे असते; पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्याकाळी साथीच्या रोगांमुळे लोकसंख्या नियंत्रण होत असे. आता चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंब शहरातून दिसते. उपभोग संस्कृतीत आईवडिलांना बरेचदा वृद्धाश्रमात टाकले जाते किंवा घराबाहेर हाकलून दिले जाते. अशावेळी काहीजणांना न्यायालयात जाऊन दाद मागता येते पण बऱ्याच जणांना असे काही करता येते हे माहित नसते. ज्या तीस टक्के लोकांना उरलेले सत्तर टक्के पोसावे लागतात, त्यांचे ही भवितव्य फारसे आशादायक नसते. मोठाल्या सदनिकेत किंवा बंगल्यात म्हातारा- म्हातारी दोघे किंवा काही वेळा एकटेच असतात. मुले परदेशात असतात. काही वेळा आई-वडील गेलेत, हे दोन तीन दिवसांनी लक्षात येते. ही  परिस्थिती रोज वृत्तपत्रातून वाचायला मिळते. अशा परिस्थितीत साथीचे रोग परवडतात; असेच म्हणावे लागेल. त्यात अकार्यक्षम आणि अनिर्मितीक्षम लोक कमी होतील. ‘जातस्यहि ध्रुवोर्म्रत्यु’ म्हणत वाढलेल्या भारतीय समाजात, असे लोक ‘औषधं जान्हवी तो यम् वैयो नारायणो हरित’ हे विसरून नव्वदीत डॉक्टरांना वारेमाप पैसा देऊन महागड्या शस्त्रक्रिया करून घेतात, हेही अनाकलनीय ठरते. विल्यम रुडिमन यांच्या मते जेव्हा जेव्हा पृथ्वीवर साथीच्या रोगांनी  थैमान मांडले आणि त्यात मोठ्या संख्येने माणसांचे बळी घेतले, तेव्हा तेव्हा पृथ्वीच्या जलवायुमानावर (क्लायमेट) त्याचा परिणाम झाला.

गेल्या दोन हजार वर्षांत अधूनमधून कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण एकदम सरासरी पेक्षा कमी झाले. ह्यासाठी नैसर्गिक कारणे जबाबदार असावीत असे मानण्यात येत होते; पण जेव्हा मानवी लोकसंख्या रोगांच्या साथींमुळे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली तेव्हा तेव्हा शेती कमी प्रमाणात होऊ लागली. मोकळ्या पडलेल्या शेतजमिनींच्या जागी जंगले वाढू लागली. जंगले वाढल्यावर वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण कमी झाले. रुडिमननी अशी काही उदाहरणे दिलेली आहेत. इ.स. ५४० च्या सुमारास अनेक रोगांच्या साथींनी मानवी लोकसंख्या एकदम कमी झाली. त्याच प्रमाणे १४ व्या शतकातही कॉलराच्या साथीने मानवी लोकसंख्या कमी झाली. त्यातच आशिया चेंगीजखानाने मोठ्या प्रमाणावर नरसंहार केला. ह्यामुळे जगाची लोकसंख्या तीस ते पस्तीस टक्क्यांनी कमी झाली, असा अंदाज बांधता येतो. पंधराव्या-सोळाव्या शतकात युरोपी लोकांनी अमेरिकेत नवे रोग नेले. त्यामुळे अमेरिकेच्या दोन्ही भूखंडातील स्थानिकांची संख्या नव्वद टक्क्यांनी कमी झाली असावी. ह्या प्रत्येक वेळी त्या त्या भूभागात स्थानिक स्वरूपाची हिमयुगे अवतरली. एक प्रकारे पृथ्वीच्या वातावरणाचे संतुलन साधण्याचा हा निसर्गाचा प्रयत्न असावा, असे रुडिमन यांना वाटते. त्यांच्या प्लोज, प्लेग्ज अँड पेट्रोलियम ह्या २००५ सालच्या ग्रंथात त्यांचे हे विचार विस्तृतपणे मांडण्यात आलेले आहेत. ह्यासंबंधी कुणाला अधिक वाचन करायचे असेल तर ‘सायंटिफिक अमेरिकन’ ह्या मासिकाचे मानवी उत्क्रांती संबंधीचे खास विशेषांक वाचावेत. त्यातही गॅरिस्टिक्स यांचे लेख उल्लेखनीय आहेत. ‘ट्रेसेस ऑफ या डिस्टंट पास्ट’ हा लेख ह्या संदर्भात विशेष माहितीप्रद आहे. तसेच ‘ब्लॅक डेथ’ ह्या पुस्तकातही बरीच माहिती मिळते. ‘द प्लेग्ज’ हे साथीच्या रोगांसंबंधीचे ख्रिस्तोफर विल्सचे पुस्तक ही ह्या संबंधीची बरीच माहीती देते. युरोपातून कुणाकुणाला कसे आणि कधी हाकलले गेले ह्याची माहीती ‘द वर्ल्डली गुड्स’ ह्या लिझाजार्डीनच्या पुस्तकात सविस्तर देण्यात आली आहे.

निरंजन घाटे हे विज्ञानलेखक असून त्यांना भरपूर वाचन, चिंतन आणि लिखाणाची आवड आहे. विज्ञान सोप्या भाषेत समजावता यावं म्हणून त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात मनसोक्त काम केलं आहे. आपल्या प्रतिक्रियांसाठी संपर्क – 9561190500