देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 96 हजार पार; तर आतापर्यंत 3029 रुग्णांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला तरीही कोरोना बाधितांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे. देशव्यापी ५५ दिवसांच्या लॉकडाऊननंतरही महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीत मात्र कोरोना संक्रमणाचा वेग वाढलेला दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ५,२४२ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले तर १५७ मृत्यू झालेत. चिंता वाढवणारी बाब म्हणजे भारतात एका दिवसात आढळलेली ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. या नवीन रुग्णांनंतर भारतातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९६,१६९ वर पोहचली आहे. तर 36 हजार 824 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील तीन दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 13.6 दिवसांवर आला आहे. तर मागील 14 दिवसांत हा दर 11.5 वर होता. देशात रविवारी कोरोना व्हायरसचे जवळपास पाच हजार नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, मृत्यूदरात घट होऊन 3.1 टक्क्यांवर आला आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून हा दर 37.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.

भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 106 दिवसांमध्ये 80 हजारांवर पोहोचली आहे. तर ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि अमेरिकेला या संख्येवर पोहोचण्यासाठी 44 ते 66 दिवस लागले होते. आठ राज्यात आणि केंद्र शासित प्रदेश तसेच, अरुणाचल प्रदेश, चंदिगढ, लडाख, मेघालय, मिझोरम, पद्दुचेरी आणि अंदमान निकोबार द्वीप समूह आणि ददरा आणि नगर हवेलीमध्ये मागील 24 तासांत कोरोनाचा कोणताही रुग्ण समोर आलेला नाही. सिक्किम, नागालँड, दमन आणि दीव, लक्षद्वीपमध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment