मुंबई । मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या कारणाने लॉकडाउन संपेपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यविक्रीची दुकान सुरु करण्याचे संकेत दिले होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क मुंबई शहर विभागाचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी परिपत्रक काढत ३० एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आलेला मद्यविक्रीचा आदेश ३ मे पर्यंत लागू असणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं तळीरामांचा घसा आणखी काही दिवस कोरडाच राहणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी या परिपत्रकात म्हटलं की, “कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे इत्यादी बाबी टाळणं आवश्यक आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री ३० एप्रिल २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र लॉकडाउनचा कालावाधी वाढवण्यात आला असल्याने मद्यविक्री ३ मे २०२० पर्यंत पूर्ण दिवस बंद राहील” असं जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकात स्पष्ट केलं आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीवर कारवाई करण्यात येईलअसंही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, याआधी फेसबुकवर संवाद साधताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यविक्री दुकाने खुली करण्याचे संकेत दिले होते. राजेश टोपे यांनी ट्विट करताना सांगितलं होतं की, लॉकडाउनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश नसला तरी याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम तो निर्णय जाहीर केला जाईल. मात्र, मुंबईतील परिस्थिती पाहता ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार हे स्पष्ट झालं आहे.
WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”