औरंगाबाद – जिल्हा प्रशासनाने कडक नियमावली केल्याने काही दिवसातच औरंगाबाद महापालिकेने दिलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे टार्गेट पूर्ण केले आहे. राज्य सरकारने शहराला लसीकरणासाठी 10 लाख 32 हजार 174 एवढे टार्गेट दिले होते. मात्र , पालिकेने याही पुढे जाऊन 11 लाख 57 हजार 726 नागरिकांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे आजघडीला शहरात 112.16 टक्के लसीकरण झाले आहे.
लस नाही तर पेट्रोल नाही, रेशन नाही, सरकारी कार्यालयांत प्रवेश नाही, या कडक नियमावलीमुळे ज्या नागरिकांनी आतापर्यंत लसीचा एकही डोस घेतलेला नाही, त्या नागरिकांनी रांगेत उभे राहून लसीचा पहिला डोस घेण्यास सुरूवात केली आहे. उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत असतानाही तब्बल 87 ठिकाणी लसीकरण, कोरोना तपासणी करण्यासाठी प्रशासनाची कसरत सुरू आहे. 6 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जात असून चार केंद्रावर सकाळी 8 ते सायंकाळी 11 वाजेपर्यंत लसीकरण सुरू आहे. गर्दीमुळे घाटी रुग्णालयाकडून 10 कर्मचारी लसीकरणासाठी घेण्यात आले आहे.
कडक नियमावलीमुळे सोमवारपासून लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मागील आठवडाभरात शहरात प्रत्येक दिवशी लसीकरणाची विक्रमी नोंद झाली आहे. शासनाने पालिकेला 10 लाख 32 हजार 174 एवढे टार्गेट दिलेले आहे. मात्र, नागरिकांच्या प्रतिसादामुळेच 27 नोव्हेंबरपर्यंत शहरात एकूण 11 लाख 57 हजार 726 नागरिकांनी कोरोना लस टोचून घेतली आहे. यात 7 लाख 46 हजार 565 जणांची पहिला डोस घेतला आहे. तर 4 लाख 11 हजार 161 जणांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. याप्रमाणे टार्गेटपेक्षाही अधिक एकूण 112 टक्के लसीकरण झाले आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
शहरात 27 नोव्हेंबरपर्यंत झालेले लसीकरण –
कोरोना लसीकरण टार्गेट : 10,32,174
पहिला डोस : 7,46,565 – 72.33 टक्के
दुसरा डोस : 4,11,161 – 39.83 टक्के
एकूण लसीकरण : 11,57,726 – 112 टक्के.