हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे म्हणतात की देव अमर आहे! भारतीय श्रद्धांच्या आधारे देव प्रत्येक कणाकणात वास करतो आणि तो अदृश्य आहे, तो निरंकार आहे,परंतु या आपल्या देशात मनुष्याच्या रुपात एक देव होता ज्याने आपल्या भक्तांच्या इच्छांची नेहमीच पूर्तता केली आहे .. हे दुसरे तिसरे कोणीही नसून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे.क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन आता या खेळातून निवृत्त झालेला आहे पण क्रिकेटविषयीची त्याची आवड, त्याचा निर्धार आजही लोकांच्या मनात घर करून आहे.
सचिन हा क्रिकेट जगतातील एका युगसारखा आहे.असे म्हणतात की कोणाला हा खेळ समजून घ्यायचा असेल तर त्याने सचिनकडे पहावे.तो या खेळाचा एक अध्याय आहे ज्याशिवाय क्रिकेट अपूर्ण आहे.
वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केलेला सचिन आज ४७ वर्षांचा झाला आहे.२४ एप्रिल १९७३ रोजी जन्मलेल्या सचिनच्या नावे खेळात भरपूर रेकॉर्ड नोंदले गेलेले आहेत पण आपल्या एका वाढदिवशी त्याने असा काही डाव खेळला ज्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
सचिनच्या कारकीर्दीतील असाच एक डाव म्हणजे 1998 मध्ये शारजा येथे खेळल्या गेलेल्या कोका-कोला कपचा अंतिम सामना. ऑस्ट्रेलिया विरुद्ध हा सामना खेळला गेला, त्यानंतर विरोधी संघाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची स्वप्ने पडली.
आजच्याच दिवशी सचिनने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुबईतील वाळवंटात आपल्या शानदार शतकाच्या खेळीने मोठा धमाका केला आणि भारतीय संघाला ६ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला.
कोका-कोला कप फायनल
२२ एप्रिल रोजी अंतिम सामन्याच्या दोनच दिवसांआधी सचिनने एकट्याने भारतीय संघासाठी १४३ धावा केल्या आणि भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.हा सामनाही ऑस्ट्रेलियाबरोबरच होता आणि त्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते परंतु सरस धावगतीच्या जोरावर या त्रिशंकू मालिकेत भारताने न्यूझीलंडला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान आपले निश्चित केले.
१९९८ साली क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया हा जगातील पहिला क्रमांकाचा दादा संघ ठरला होता आणि भारताला त्यांचा पराभव करणे हे खूप कठीण काम होते, परंतु अंतिम सामना आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन आपल्या ठाम हेतूने मैदानावर उतरला.या सामन्यात ऑस्ट्रेलियान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्टीव्ह वॉ आणि डॅरेन लेहमन यांच्या अर्धशतकांच्या डावाच्या जोरावर ५० षटकांत ९ गडी गमावून २७२ धावा केल्या.
हे लक्ष्य भारतासाठी सोपे नव्हते, परंतु असे म्हटले जाते की जर आपण दृढ हेतूने काही करण्याचा दृढनिश्चय केला तर ते नक्कीच साधले जाते. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सचिननेही असेच काहीसे केले.
सौरव गांगुलीबरोबर सलामी देताना सचिनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजविरूद्ध सुरुवातीपासूनच आक्रमण सुरू केले आणि त्याने १३१ चेंडूत १३४ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकारही ठोकले. शेवटी संघाचा कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनने ५८ धावांची खेळी खेळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.सचिनच्या ९०च्या दशकाच्या उत्तरार्धात खेळलेल्या या खेळीने भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले.त्याच्या वाढदिवशी सचिनचा हा सर्वात खास डाव ठरला.
शेन वॉर्नची केली जोरदार धुलाई
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० बळी घेणारा अनुभवी शेन वॉर्न हा या दौऱ्यातील सर्वात धोकादायक फिरकी गोलंदाज होता. कोणत्याही फलंदाजाला त्याची फिरकी समजणे सोपे नव्हते, पण या सचिनने कोका-कोला कपमध्ये वॉर्नला सपशेल पराभूत केले. म्हणूनच वॉर्नने एका मुलाखतीत म्हटले होते की या मालिकेदरम्यान रात्री सचिनचे स्वप्न पडते.
कोका-कोला कपच्या अंतिम सामन्यात वॉर्न खूपच महागडा ठरला.त्याने आपल्या १० षटकांत तब्ब्ल ६१ धावा दिल्या,परंतु त्याला एकही विकेट मिळाली नाही. टॉम मूडीनंतर ९.३ षटकांत ६३ धावा देणारा वॉर्न या सामन्यातील दुसरा महागडा गोलंदाज ठरला होता.वॉर्नला सचिनच्या फलंदाजीने फारच प्रभावित केले आणि सामन्यानंतर सचिनला त्याने त्याच्या टी-शर्टवर ऑटोग्राफ मागितला.
वाढदिवशी मिळाली एक विशेष भेट
कोका कोला कप फायनल जिंकल्यानंतर सचिनने आपला वाढदिवस शानदारपणे साजरा केला.या स्पर्धेतील दमदार कामगिरीबद्दल त्याला ‘मॅन ऑफ द सीरीज’ म्हणून निवडले गेले तसेच अंतिम सामन्यातील खेळीसाठी त्याला ‘मॅन ऑफ मॅच’ म्हणून निवडण्यात आले. यामुळे त्याच्या आनंदात आणखीनच भर पडली.
यासह ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉने त्याचाहा क्षण अधिकच खास बनविला.सचिनने एका निवेदनात म्हटले आहे की सामन्यानंतर स्टीव्ह वॉने कबूल केले की आपण भारताकडून पराभूत झालेलो नाही,उलट सचिनने एकट्याने त्यांना पराभूत केले.स्टीव्हचे असे म्हणणे हे त्याच्यासाठी विशेष होते.मात्र,सध्या देशात कोरोना विषाणूच्या साथीमुळे सचिनने यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र#HelloMaharashtrahttps://t.co/yT96JZZylX
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 10, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.
https://youtu.be/0GY0gGWs4J8