‘क्रिकेटचा दादा’ सौरव गांगुली झाला ४८ वर्षांचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सौरभ गांगुली. कोलकात्याचा वाघ म्हणून भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेला बेदरकार कर्णधार. असा कर्णधार ज्याने बलाढ्य संघांविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना हिंमतीने उभं राहायला शिकवलं, असा खेळाडू ज्याने प्रतिस्पर्ध्यालाही त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची धमक ठेवली आणि असा माणूस ज्याने भारतीय क्रिकेटची २० वर्षांहून अधिक काळ सेवा करताना जागतिक पटलावर भारताला एक नवी ओळख निर्माण करून दिली.

सौरभ गांगुली आज ४८ वर्षांचा झाला आहे. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचा सुवर्णकाळ गांगुलीने भारताला दाखवला. आपल्या डावखुऱ्या फलंदाजीने नजाकतदार फटके मारत खेळपट्टीवर स्थिरावणारा गांगुली प्रतिस्पर्ध्याच्या मनात नेहमी धडकी भरवत असे. पायांची हालचाल करुन पुढे येत त्याने मारलेले षटकार आजही लोकांच्यास मनात घर करुन आहेत. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत संघाला अंतिम फेरीत पोहचवणारा गांगुली, २००२ साली नेटवेस्ट मालिकेत इंग्लंडला धूळ चारणारा गांगुली, २००८ साली कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करणारा गांगुली, त्यानंतर काही काळ समालोचन करणारा आणि आता बीसीसीआय अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारा गांगुली हे सगळं करिअर केवळ लाजवाब आहे.

सेहवाग, युवराज, हरभजन, मोंगिया, जहीर खान, नेहरा, मोहम्मद कैफ, इरफान पठाण हे गांगुलीने घडवलेले खेळाडू २००० ते २०१५ पर्यंत भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. सचिनपेक्षा थोडं कमी आणि द्रविडपेक्षा थोडं जास्त चाहत्यांचं प्रेम मिळालेला सौरभ भारतीयांना कायम लक्षात राहील – तो अँग्री यंग कॅप्टन म्हणूनच…

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.