मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या वन-डे आणि टी 20 मालिकेला कोरोनाचा फटका बसला आहे. या मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होणार होती. पण, यजमान श्रीलंकेच्या कॅम्पमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हि मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
श्रीलंकेची टीम काही दिवसांपूर्वीच इंग्लंडहुन परतली होती. हि टीम माघारी आल्यानंतर या टीमची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये श्रीलंकेचे बॅटींग कोच ग्रँट फ्लॉवर आणि सपोर्ट स्टाफ जीटी निराशेन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या मालिकेचं वेळापत्रक बदलण्याची विनंती बीसीसीआयला केली होती. बीसीसीआयने ती विनंती मान्य केली होती.
कोरोनाच्या प्रसारामुळे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वन-डे मालिका 13 जुलैच्या ऐवजी 18 जुलै रोजी सुरु होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी हि माहिती दिली आहे. या मालिकेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.