नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घेतलेल्या एका निर्णयाने लाखो क्रिकेटप्रेमींचे मन जिंकले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयानंतर आयपीएलमधील सर्व खेळाडू हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील पत्नी अनुष्का शर्मासह मुंबईला परतला आहे. सगळे खेळाडू परतत असताना महेंद्रसिंह धोनीने चेन्नईच्या टीममधील सर्व खेळाडू परतल्यानंतरच रांचीला घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
‘विदेशी खेळाडू घरी परतल्यानंतरच घरी जाण्याचा निर्णय धोनीने घेतला आहे. चेन्नईचे सर्व खेळाडू सध्या दिल्लीमध्ये आहेत. मोईन अली आणि सॅम करन हे दोन इंग्लिंश खेळाडू बुधवारी मायदेशी परतले आहेत. सर्व विदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने मायदेशी पाठवण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. अशी माहिती चेन्नई टीमच्या एका सदस्याने दिली आहे.
चेन्नई टीमच्या व्हर्च्युअल बैठकीत धोनी म्हणाला कि, “आयपीएल भारतामध्ये होत आहे. विदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला घरी जाण्याची प्राथमिकता मिळाली पाहिजे. भारतीय खेळाडू नंतर घरी जाऊ शकतात.” “हॉटेलमधून बाहेर जाणारा माही हा टीमचा शेवटचा व्यक्ती असेल. तो पहिल्यांदा विदेशी खेळाडूंना आणि नंतर भारतीय खेळाडूंना घरी पाठवणार आहे. सर्वजण सुरक्षित घरी परतल्यानंतर तो घरी जाण्यासाठी विमान पकडेल.” अशी माहिती चेन्नई टीमच्या एका सदस्याने दिली आहे.
चेन्नईने दिल्लीहून खेळाडूंना घरी जाण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. एक दहा सीटर विमानाने खेळाडूंना राजकोट आणि मुंबईत सोडण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य खेळाडूंना संध्याकाळी बंगळुरु आणि चेन्नईमध्ये नेण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जच्या संघानेसुद्धा आपल्या खेळाडूंसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. तसेच कोलकाता, हैदराबाद आणि राजस्थान संघाचे खेळाडू घरी रवाना झाले आहेत.