शिंदे-फडणवीस सरकारला मुहूर्त मिळाला; ‘या’ दिवशी होणार मंत्रीमंडळाचा विस्तार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, दोघांच्या शपथविधीला एक महिना पूर्ण झाला तरी अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने तो केव्हा होणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर महिनाभरानंतर शिंदे- फडणवीस सरकारला मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला असून तो 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.

शिंदे- फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितली होते. त्यांच्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही मंत्रिमंडळाचा विस्तार हा येत्या रविवारपर्यंत होईल, असे महत्वाचे विधान केले होते.

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणावर उद्या गुरुवारी 04 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तार हा पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता मंत्रिमंडळाचा विस्तार हा 5 ऑगस्ट रोजी राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

शिंदे सरकारचे 14 to 20 मंत्री घेणार शपथ?

शिंदे – फडणवीस सरकारच्यावतीने मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित करण्यात आली असून शपथविधीत काही जुने तर काही नवीन चेहरे दिसणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावेळी प्रादेशिक विभाग निहाय जागा लक्षात घेत मंत्रीपदाचे वाटप केले जाणार असून उदय सामंत, दादा भुसे, तानाजी सावंत, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, बच्चू कडू यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.