हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या असलेल्या आणि एक वर्षांपासून निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत अद्यापही निर्णय नाही. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांनी 12 आमदारांची यादी पाठवली होती. त्याला एक वर्ष होऊन गेले. रितसर ठराव केला. 170 सदस्यांचा पाठिंबा असलेल्या सरकारनं ही नावं पाठवली. त्यावरही अजून निर्णय झाला नाही. ते कशात बसतं. हे योग्य आहे का, हे लोकशाहीत चालतं काय?, राज्यपालांना अधिकार आहेत. त्याचा त्यांनी वापर करावा. आम्ही राज्यपालांचे कुठलेही अधिकार कमी केलेले नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे.
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी प्रवेश कार्यक्रम पार पडला. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बारा आमदारांच्या नियुक्त्या अजूनही का झालेल्या नाहीत. हे लोकशाहीत चालतं काय?, यावेळी कुलगुरू नियुक्तीबाबत राज्यपालांचे कुठलेही अधिकार कमी केले जात नाहीत. कुलगुरूंच्या निवडीसंदर्भात जी समिती आहे. ती पाच सात जी काही नावे असतील ती सिलेक्ट करेल. जी नावे योग्यतेची वाटतील ती आल्यावर सरकार त्यातून दोन नावं राज्यपालांकडे पाठवतील. राज्यपाल त्यातून एक नाव त्याचे प्रमुख म्हणून फायनल करायचे आहे. म्हणजे सरकार पाच, सात नाव ठरवणार नाही. जी समिती आहे ती समिती ठरवणार आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत आम्ही चांगले वकील दिले. उद्धव ठाकरेंनी अनेकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली. सर्व नेत्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. टॉपचे वकील या सर्वांशी चर्चा करून ओबीसी आरक्षण टिकावं आणि लोकशाहीत समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधत्व मिळावं याचे प्रयत्न केले. त्यामुळे इतर राज्यात असा प्रसंग आला तेव्हा त्यांना मदत झाली, असे पवार यांनी सांगितले.