मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा यांचा स्मृतीदिन. यानिमित्तानं फडणवीस यांनी सोशल मीडियावर शाहू महाराजांना अभिवादन करताना त्यांच्या उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केल्यानं नेटकरी चांगलेच संतापले आहेत. या प्रकारानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर फडणवीस यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. सोशल मीडियावर वादंग वाढत असल्याचे समजताच काही वेळानंतर फडणवीस यांनी ती पोस्ट काढून टाकली.
दरम्यान, शाहू महाराजांचे कार्य आणि त्यांचे समाज सुधारणेचे काम पाहता फडणवीसांनी त्यांचा उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ करण्याला नेटकऱ्यानी तीव्र आक्षेप घेतला आहे. बऱ्याच जणांनी फडणवीस यांनी मुद्दाम खोडसाळपणा केल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे. या वादग्रस्त प्रकारानंतर सोशल मीडियावर फडणवीस यांनी शाहू महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी जाहीर माफी मागावी अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकारावरून फडणवीस सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचे भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सोशल मीडियावर फडणवीसवर टीका केली जात असल्याच्या कारणावरून थेट मुंबई पोलीस आयुक्तांना कारवाई काण्याची मागणी केली होती. तसेच फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना जशाच तसं उत्तर भाजप देण्यास समर्थ असल्याचा त्यांनी इशारा दिला होता. दरम्यान, आता शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख करून फडणवीस यांनी सोशल मीडियावर स्वतःहून रोष ओढवून घेतला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”