थर्ड अँगल । अजित पवार (Ajit Pawar) हे शरद पवारांच्या छत्रछायेखाली वाढलेले आणि जोपासले गेलेले नेतृत्व आहे. शरद पवारांनीच आपला उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांची निवड केल्याने, ते कायम सत्तेत आहेत. साहजिकच इतर नेते, कार्यकर्ते यांच्यात त्यांची दहशत कायम राहिली. दादाच्या विरोधात बोललो तर,ते आपलं राजकीय जीवन बरबाद करतील, अशी कार्यकर्त्यांना साधार भीती असल्याने, जाहीररीत्या कोणी त्यांच्या विरोधात बोलत नाही. मात्र खाजगीत कडवट टीका करतात. कायम सत्तेच्या सर्वोच्च पदी राहिल्याने व कोणाचा उघड विरोध नसल्याने,दादा दिवसेंदिवस उर्मट व एककल्ली बनत गेले. आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा पाणउतारा करीत गेले. पण त्यांचा कोणी प्रतिवाद केला नाही. कारण शरद पवारांचे ते उत्तराधिकारी होते..आणि शरद पवारांनीही (Sharad Pawar) त्यांना रोखल्याच़ दिसलं नाही.
अजित पवार गेल्या दहा- बारा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदारांचा गट निर्माण करीत होते. तो गट होताही पण अदृश्य होता. शरदरावांनाही ते माहित होते. अंधारात हे सगळे दादांचे असायचे मात्र शरद पवारांसमोर यांची मान वर करण्याचीही हिंमत नसायची. त्यामुळे शरदरावांनी त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नसावे. पहाटेच्या शपथविधीनंतरचा फियास्को त्याचं उदाहरण आहे. मात्र तो अनुभव लक्षात घेऊन दादा- फडणविसांनी यावेळी अधिक काळजी घेतलीय. दादांसोबत इतर आठजणांना मंत्री केलयं. त्यातील चौघे तर ईडीच्या रडारवरचे होते.त्यातही छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची अवस्था अधिकच केविलवाणी होणार आहे. मंत्री बनलेल्या या आठजणांपैकी फक्त अजित पवारांबाबत मी लगेच विधान करीत नाही. मात्र इतर कोणीही पुन्हा निवडून येण्याची अजिबात शक्यता नाही. यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की, अजित पवार जनमानसात अजिबात लोकप्रिय नाहीत. त्यांच्या मतदारसंघाबाहेर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोणा उमेदवाराला मत मिळण्याची शक्यता नाही. ते कुठल्याच अर्थाने लोकनेते नाहीत. महाराष्ट्रातील सर्वात भ्रष्ट नेता, ही अजित पवारांची प्रतिमा भारतीय जनता पक्षानेच तर बनवलीय.
आता समाजमाध्यमांवर फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.त्यात फडणवीस म्हणताहेत…आमचं सरकार आलं की…अजित पवार इज चक्की पिसींग…पिसींग ॲंड पिसींग..! आता येणाऱ्या निवडणुकीपर्यंत शिंदे,फडणविसांसोबत अजित पवारांचाही चेहरा जाहिराती, बातम्यांमधून समोर येणार आहे.याचा मतदारांवर चांगला परिणाम होईल? इतका खोटारडेपणा मतदार सहन करतील? घराणेशाही आणि भ्रष्टाचार या दोन्ही मुद्यांवर बोलावे, अशी भाजपाची स्थिती नाही. भाजपा घराणेशाही कशी राबवतेय, सांभाळतेय याची पन्नास उदाहरणं देता येतील…आणि जे जे भ्रष्ट नेते आहेत त्यांचं भाजपामध्ये पायघड्या घालून स्वागत केलं जातयं, हे ही मतदारांना दिसतयं.
तरीही आदरणीय नरेंद्र मोदीजींनी (Narendra Modi) एनसीपी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी. या पक्षाने ७०हजार कोटींचा भ्रष्टाचार केलाय, असं आठवड्यापूर्वीच सांगीतलं…आणि राष्ट्रवादीत भ्रष्ट म्हणून जी ठळक नावं घेतली जायची, तेवढ्यांना मंत्री करून टाकलं. याचा मतदारांवर सकारात्मक परिणाम होईल? मुळात ज्या पध्दतीने फडणवीसांनी शिवसेना फोडली, ते महाराष्ट्रातील जनतेला आवडलेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल सामान्य मतदारांच्या मनात सहानुभूती आहेच. आता अजित पवारांमुळे शरद पवारांबद्दल सहानुभूती वाढेल. तशी राहूल गांधींच्या पदयात्रेनंतर कॉंग्रेसची प्रतिमा सुधारलीय. या तिघांची आघाडी असणार हे स्पष्टच आहे. यात कदाचित प्रकाश आंबेडकर सहभागी झाले तर, ही आघाडी मोठं बहुमत मिळवू शकेल.
आगामी निवडणुकीत हिंदू- मुस्लिम कार्ड फारसं चालणार नाही. भाजपाकडे सकारात्मक सांगण्यासारखं काही नाही. त्यांचा विकासाचा मुद्दा टिंगलीचा ठरलाय. फडणविसांनी रेटून नेलेला समृद्धी मार्ग मृत्यू मार्ग ठरलाय. भाजपाबद्दल आधीच पुरेसं नकारात्मक वातावरण तयार झालयं. त्यात अजित पवार सामील झाल्याने, नुकसानचं होणार आहे. अजित पवारांची बंडखोरी, शरद पवारांना मानणाऱ्या मतदारांना अजिबात रूचणारी नाही. कारण शरद पवारांनी अजितदादाला भरभरून दिलयं. खरं तर काहीच द्यायचं शिल्लक ठेवलेलं नाही. तरीही त्यांनी काकाचा विश्वासघात केला, ही जखम मतदारांच्या जिव्हारी लागणार. शरद पवार याचा पुरेपूर फायदा उठवणारचं!
फडणवीस स्वत:ला कितीही हुशार समजत असले तरी, त्यांचा हा डाव हुकलाय. त्यांनी स्वत: हून अजित पवार नावाचा धोंडा आपल्या पायावर पाडून घेतलाय. अर्थात मोदी- शहांच्या सल्ल्याने, पाठबळानेच त्यांनी हे केलयं. मात्र हा निर्णय त्यांच्या निर्णायक पराभवाचं कारण ठरू शकतो. कर्नाटकचं उदाहरण ताजं आहे. मोदी- शहा काहीही करू शकतात, हे तिथल्या मतदारांनी खोटं ठरवलयं. मतदार जागृत झाला की, सत्ता, संपत्ती, जातीय व धार्मिक विद्वेष व कथीत राष्ट्रवादही उपयोगी ठरत नाही, हे तिथं दिसून आलयं. महाराष्ट्रातही त्याचं प्रत्यंतर येईल. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत असलेले बहूसंख्य आमदार पराभूत होतील. ५० खोके हिच त्यांची ओळख बनलीय. लोकांनाच लाज वाटावं, असं त्यांचं वर्तन बनलयं.
मतदारांच्या सहनशीलतेची मर्यादा फडवणीस कंपूने ओलांडलीय. अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडले, ही महाराष्ट्रातील महाआघाडीसाठी व जनतेसाठी इष्टापत्ती आहे. शरद पवारांनी राज्याच्या डोक्यावर बसवलेलं हे जोखड, आपण होऊन बाजुला झालयं. घराणेशाहीचं राजकारण करणाऱ्या, आपले कुटुंबीयच अधिक विश्वासू असतात, असं मानणाऱ्यांना हा धडा आहे. शरद पवारांना किमान आतातरी आपण चूक केली असं वाटलं तरी ते पुरेसे आहे. महाराष्ट्रात नियतीनेच बनवलेल्या या अनुकूल परिस्थितीचा उपयोग महाविकास आघाडीचे नेते कसा करून घेतात, ते पाहावे लागेल.
महारुद्र मंगनाळे
(लेखक जेष्ठ पत्रकार आणि शेतकरी आहेत)
संपर्क क्र – 9096139666