आठवडाभरात पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांची भरती करणार; फडणवीसांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. “राज्यात रखडलेल्या पोलिस भरतीची येत्या आठडाभरात जाहिरात काढू. पोलिस विभागात साडे अठरा हजार जागांसाठी भरती करू,” अशी घोषणा फडणवीसांनी केली.

केंद्राच्या वतीने देशभरात 75 हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. याचाच एक भाग म्हणून दोन हजार जणांना आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले की, सर्व विभागांमध्ये भरती प्रक्रियेचे कामकाज सुरु झालेले आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य सरकार विशेष काळजी घेणार आहे. वर्षभरामध्ये प्रस्तावित जागा भरल्या जाणार आहेत. तर महिन्याभरात साडेदहा हजार पदे ग्रामविकास विभागामार्फत भरली जाणार आहेत.

राज्य सरकारच्या 75 हजार जागांच्या मेगाभरतीला आज सुरुवात झाली आहे. आज 2 हजार जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. वर्षभरात सर्व 75 हजार जागा भरण्याचे नियोजन आहे. याशिवाय राज्यातील पहिल्या कौशल्य विद्यापीठाच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा तरुणांनी नोकऱ्या देणारे बनावे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे स्टार्ट अप पॉलिसी व विविध महामंडळांच्या माध्यमातून तरुणांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येतील. तरुणांना स्वत: पायावर उभे करण्याचा प्रयत्न राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.