हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विरोधी भाजप नेत्यांकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर अनेक मुद्यांवरून निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांनी वीज तोडणी प्रश्नवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “काल झालेल्या चर्चेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी संदर्भात जे आश्वासन दिले तर त्यांना पूर्ण करता आलेले नाही. हे ठाकरेंचे सरकार आहे. हे सरकार कोडगे आहे, शेतकऱ्यांबाबत संवेदना या सरकारला राहीलेली नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात वीज तोडणीच्या विषयावरून आक्रमक पवित्रा घेत भाजप आमदारांनी सभागृहात चांगलाच गदारोळ घेतला. यावेळी त्यांनी सभात्याग करत बाहेर येत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, मी सरकारचे अभिनंदन करतो 6 हजार 500 कोटींचे वीज बिल भरले, मी राज्याच्या सरकारकडे विनंती करतो शेतक-यांचे वीजेचे पैसे सरकारने द्यावे. मात्र, ते सरकारकडून केले जात नाही.
वास्तविक ठाकरे सरकारकडून सुलतानी पध्दतीने शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. ती तत्काळ बंद करावी. महाराष्ट्र सरकारने शेतक-यांच्या विजेच्या बिलाचे पैसे महावितरणला द्यावे. त्यांनी शेतक-यांचं वीज बील माफ कराव अशी आमची मागणी आहे.