हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या निवडणुकीवेळीच मुंबईत भाजपचा महापौर होणार होता पण मित्रपक्षांसाठी आम्ही दोन पाऊले मागे गेलो असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईत आज भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी आपल्या भाषणात फडणवीसांनी याबाबत माहिती दिली. तसेच अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला.
फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत शिवसेनाचा महापौर बसवण्यात आला. त्या वेळी भाजपचा महापौर होऊ शकला असता, आपली तयारी सुद्धा झाली होती. परंतु मित्र पक्षासाठी आपण दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला. पण यावेळी मुंबई महापालिकेवर आपलाच महापौर बसेल. आपला भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
दरम्यान, आता गणेशोत्सव, नवारोत्सवसह सर्व सण जोरात करायचे आहे. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत, असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या उद्धव ठाकरेंना लगावला. गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पण महापालिकेत भ्रष्टाचाराचा विळखा आहे. त्यामुळे मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या विळख्यातून काढलं पाहिजे. मुंबईकरांसाठी बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आपली आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.