कायद्याच्या चौकटीत राहून बोलावे, अन्यथा…; फडणवीसांचा राहुल गांधींना थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना थेट इशारा दिला आहे. “त्यांच्या सारख्या व्यक्तींवर कारवाई करून काही फायदा नसतो. अनेक केसेस यापूर्वीदेखील ते भोगत आहेत. ते तसेही बेलवरच आहेत. अनेक वेळा कोर्टात हजर राहत नाही. म्हणून वारंट निघतात. त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून बोलावे. कायद्याच्या चौकटी बाहेर काही केलं तर त्यांच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले की, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. आम्ही त्यांना सुरक्षा दिली आहे. सुरक्षितपणे आम्ही त्यांची यात्रा बाहेर काढू. पण, महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

रोज खोटं बोलायचं. ज्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली त्यांच्याबद्दल ज्यांनी जेलची पायरी पाहिली नाही, त्यांनी बोलावं. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं राज्यात राहुल गांधी यांच्याबद्दलचा राग राज्यात आहे. महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधी वाटेल तसे बोलतात. शिवसेनेचे नेते हे ते गेल्यावर काहीतरी एखादे वाक्य बोलतात. बाकी सत्तेकरिता त्यांच्यासोबत आहे. हे सावरकरांकरिता सत्ता कधीच सोडू शकत नाही, असे फडणवीसांनी म्हंटले.