हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी शासनाच्या वेबसाईटवर उमेदवारांकडून अर्ज भरले जात आहेत. मात्र, ती वेबसाईटच व्यवस्थित चालत नसल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत राज्यभरातून 11 लाख 80 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत, असे फडणवीस यांनी म्हंटले.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात एकाचवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जात आहे. मोठ्या संख्येने पोलीस भरती होत असल्याने लाखो तरुणांकडून ऑनलाईन अर्ज केले जात आहेत. मात्र, वेबसाईटवरील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना अर्ज भरता येत नाहीत. परिणामी तरुणांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत अजून पंधरा दिवस वाढवत आहोत. तसेच तरुणांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत.
अर्ज भरताना येत आहेत ‘या’ अडचणी
राज्यात 18 हजार जागांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. एकाच वेळी असंख्य उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे सर्व्हरवर लोड आल्याने ते डाऊन झाले आहेत. एक अर्ज सबमिट करण्यासाठी 4 ते 5 दिवस लागत आहेत. 30 नोव्हेंबर ही अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्ज भरण्यासाठीची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवल्याची माहिती दिली. त्यामुळे 15 डिसेंबर ही ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत राहील.
जितेंद्र आव्हाड यांनी केली होती मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्जांबाबत एक मागणी केली होती. “राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी, या तरुणांच्या भविष्याचा विचार करून, फॉर्म भरण्याची मुदत वाढवून द्यावी. यासोबतच सदर फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी देखील दूर कराव्यात. या तरुणांच्या भविष्यासाठी राज्य सरकार 15 दिवस तरी नक्की मुदतवाढ देईल अशी खात्री आहे.”असे आव्हाड यांनी म्हंटले होते.