हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी मिळाली असून, यातून त्यांचे अनेक व्यवहार समोर आले आहेत. यामध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले. ‘मातोश्री’ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, अशा नोंदी त्यांच्या डायरीमध्ये आढळल्या आहेत. या प्रकरणी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “यशवंत जाधव यांची आयकर विभाग योग्य पद्धतीने चौकशी करेल,” असे फडणवीस यांनी म्हंटले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आयकर विभागाच्याच धाडीबाबत मी सभागृहातही काही गोष्टी सांगितल्या आहेत. शंभर टक्के बीएमसीच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटलं जात आहे. 24 महिन्यांत 38 संपत्ती. त्याही कोविडच्या काळामध्ये. आम्ही आधीच म्हणत होतो कोविडच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्या व्यतिरिक्त काहीच होत न्हवते हे आता यावरून सिद्ध झाले आहे.
दरम्यान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही यशवंत जाधव यांच्या प्रकरणी शिवसेना व जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. यशवंत जाधव यांच्या डायरीतील नोंदींची चौकशी करावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.
कोण यशवंत जाधव ?
यशवंत जाधव हे माजी नगरसेवक आहेत. ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याबाबत एक डायरी उघडकीस आली आहे. 2018 ते 2022 च्या दरम्यान घडी आणि दोन कोटी रुपयांच्या लेनदेणीचा उल्लेख आहे. या डायरीत 50 लाख रुपयांची घडी आणि दोन कोटी रुपये मातोश्रीला देण्यात आल्यासंदर्भात लिहिण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील बांद्रा येथे मातोश्री नावांच घर आहे. नवीन वर्षात गिफ्ट वाटण्यासाठी हे दोन कोटी रुपये दिले गेल्याचा आरोप आता किरीट सोमय्या यांनीही केला आहे. तर यशवंत जाधव मातोश्री म्हणजे माझी आई, अशी सारवासारव यशवंत जाधव यांच्याकडून चौकशी दरम्यान करण्यात आली आहे.