हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पहाटे घेतलेला शपथविधी ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सल आहे असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. एका लोकवृत्ताच्या फेस टू फेस कार्यक्रमात त्यांनी विविध विषयांवर भाष्य करताना आपलं मन मोकळं केलं.
धनंजय मुंडे म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी झाला. मी आदल्यादिवशी त्यांच्यासोबत होतो. आम्ही सगळेच जण एकत्र होतो. सलग आठ दिवस खूप प्रवास झाला होता. मी ठरवलं होतं की, दुसऱ्या दिवशी मला आराम करायचा आहे. यासाठी गोळ्या घेऊन मित्राच्या फ्लॅटवर आराम करायचं ठरवलं. तसं पाहायला गेलं तर दुसऱ्या दिवशी काही विशेष कामही नव्हतं. त्यामुळे असं काही घडेल, याची कल्पनाही नव्हती. दुपारी १ नंतर उठलो. त्यानंतर सगळा प्रसंग मला समजला. मात्र, तोपर्यंत खूप काही घडून गेलं होतं. माझ्याबाबतही काही प्रश्न उपस्थित करण्यात आले, असं घडायला नको होतं. तो दिवस टाळायला हवा होता. ते शल्य कायम राहील, असं धनंजय मुंडे यांनी म्हंटल.
दरम्यान, अजित पवारांनी फडणवीस यांच्यासोबत अचानकपणे पहाटे शपथविधी घेतल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. त्यावेळी अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे यांचा फोन नॉट रीचेबल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये मुंडे यांच्याबाबत संशय निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणा पण दिल्या होत्या.