बीड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या परळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मोदींचे हटके स्वरुपात स्वागत करणारे ट्विट केले आहे. धनंजय मुंडे ट्वीटमध्ये म्हणतात, “मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!, पण एकच इच्छा आहे. परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा!”
अंबाजोगाई ते परळी या महामार्गाची दुरावस्था झाली असल्याचे धनंजय मुंडेंना आपल्या ट्विटमधून सुचवायचे आहे. बीडच्या विकासात महत्वाचा भाग असलेल्या या महामार्गावर खड्डे पडले आहेत. राज्यात भाजपाचे सरकार असताना तुमच्या मंत्र्यांनी विकास कसा साधला आहे, हे यातून पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
दरम्यान सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आता महाराष्ट्र विधासभेच्या प्रचार रणधुमाळीत उडी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर ते उद्या परळी मध्ये येणार आहेत. भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. दरम्यान हीच संधी साधत त्यांनी मोदींच्या ‘विकासा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या मुंडे यांची हि पोस्ट महाराष्ट्रातील राजकारणामध्ये चर्चेचा विषय बनली आहे.
मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!
एकच इच्छा आहे, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा! pic.twitter.com/3xfNq1OmjI
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 16, 2019