इंदापूर प्रतिनिधी | भाजपच्या वाटेवर असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. त्याआधी त्यांनी अकलूज येथे जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी इंदापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले.
जुन्नरची जागा आघाडीत काँग्रेसला सोडली. मात्र इंदापूरची जागा सोडायला राष्ट्रवादी तयार नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शब्द देऊन देखील त्यांनी तो शब्द पाळला नाही. अख्या महाराष्ट्र सोडून शिवस्वराज्य यात्रा इंदापूरात कशी आली. यापुढे अशा लबाड लोकांचे काम करणार नाही असे म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी पवार कुटुंबावर चांगलेच तोंडसुख घेतले. त्याच प्रमाणे त्यांनी भविष्यात परिवर्तन करावे लागले तरी तयार रहा असा सूचक इशारा देखील कार्यकर्त्यांना दिला आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना सांगितले की, साडेचार पाच वर्षात आपण सत्तेत नव्हतो. कुठल्या पदावर नव्हतो तरीही विधानभवन मंत्रालयात गेलो, तर मुख्यमंत्र्यांनी कधी आपल्याला कुठल्याही कामासाठी नकार दिला नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून उभं राहण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र आघाडी असल्याने मी नकार दिला. तरीही मुख्यमंत्र्यांनी मनात राग ठेवला नाही. पुस्तक प्रकाशनावेळी उपस्थित राहण्यासाठी कॅबिनेट मिटींगच्या वेळेत बदल करून घेतले. दिलेला शब्द पाळणारी एका बाजूला आणि ज्यांच्यासाठी काम केलं ती एका बाजूला अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.