‘कितीही मोठी ऑफर दिली तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही’- सुधीर मुनगंटीवार

मुंबई । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशा वेळी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. “दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही,” असं ते म्हणाले आहेत.

“एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ… खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही हा कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे. संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटतील,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, एकनाथ खडसे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चेबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ते असं काही करणार नसल्याचे म्हटलं.

‘एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ आणि जुने-जाणते नेते आहेत. पक्षाने आतापर्यंत त्यांना भरभरून दिलं आहे. त्यामुळं भाजपचं नुकसान होईल अशी कोणतीही भूमिका एकनाथ खडसे घेणार नाहीत,’ असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘नाथाभाऊंच्या बद्दल यापूर्वी अनेकदा अशा चर्चा झाल्या होत्या. मात्र, त्या अफवाच ठरल्या होत्या. आताची चर्चा देखील अफवाच ठरेल,’ असं पाटील म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

You might also like