शिंदेंचा ठाकरे बंधूंना झटका : 3,500 पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावेळी केली सडकून टीका; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेक झटके दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शिंदेनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा झटका दिला आहे. शिवसेना आणि मनसेच्या तब्बल 3,500 पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिंदेंनी सडकून टीका केली.

मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी कार्यकर्त्यांना शिंदे गटात प्रवेश दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. या सरकारमध्ये 170 आमदारांचं मजबूत बहुमत आहे.

काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. त्यांना पोटशूळ उठलेलं आहे की, 3 महिन्यात हे सरकार एवढं काम करतंय, मग हेच पुढचे अडीच वर्ष चालू राहीलं तर काय परिस्थिती होईल? याची चिंता आणि भ्रांत त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. वास्तविक या सरकारकडे 170 आमदारांचं बहुमत आहे हे विसरू नये. काही लोक जाणीवपूर्वक जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आघाडीत काही अलबेल दिसत नाही, असा टोला यावेळी शिंदेनी लगावला आहे.