कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव सुरु आहे. याविषयी बोलताना कराड दक्षिणचे विद्यमान आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज चीनविरुद्ध सरकार घेत असलेल्या भूमिकेला काँग्रेसकडून पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. मात्र भाजपमधील लोकांनीच याबाबत दोन भूमिका मांडू नयेत अशी टिप्पणीही त्यांनी केली. आज मन की बात या आपल्या स्वगतपर मनोगतावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली. तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी चीनसोबत लढताना काही वाटाघाटी कराव्या लागतील असं मत व्यक्त केलं.
या दोघांच्याही बोलण्यात वेगळेपण दिसत असून देशातील जनतेला विश्वासात घेऊन केंद्र सरकारने ही लढाई लढायला हवी असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. चीनबाबत सरकार शांतीचा किंवा युध्दाचा जो मार्ग अवलंबेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल अशी प्रतिक्रियाही पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे बोलताना दिली.
रशिया दौऱ्यावर असणाऱ्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा लढाऊ विमानं तात्काळ भारताच्या ताफ्यात जमा करण्याची विनंती रशियाला केली असून भारत जर लढायच्या भूमिकेत असेल तर त्यालाही आमचा पाठिंबाच असेल असं चव्हाण पुढे म्हणाले.