Eye Flu | राज्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचे प्रमाण पसरत आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनीया अशा आजारांनी थैमान घातले आहे. अशातच आता महाराष्ट्रात डोळे येण्याच्या आजाराने (Eye Flu) नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. अनेक भागात तसेच गाव पातळीवर डोळे येण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे, राज्यात या आजाराचे आतापर्यंत 2 लाख 88 हजार 703 रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराची भीती निर्माण झाली आहे.
कोणत्या भागात किती रुग्ण आढळले?
बुलडाणा – 35 हजार 466 रुग्ण
जळगाव – 19 हजार 632 रुग्ण
पुणे – 16 हजार 105 रुग्ण
नांदेड – 14 हजार 96 रुग्ण
अमरावती – 12 हजार 290 रुग्ण
अकोला – 12 हजार 134 रुग्ण
मुंबई – 1882 रुग्ण
वरती दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त रुग्ण बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यामुळे याबाबत काळजी आणि खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे. तसेच, डोळे आलेल्या व्यक्तीने काळा चष्मा वापरावा, डोळे सतत साफ करावे, डोळ्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी, त्याचबरोबर डोळ्यांना नख किंवा कोणतीही टोकदार वस्तू लावू नये असे सल्ले देखील पाळण्यास सांगितले आहे.
डोळे येणे म्हणजे काय? (Eye Flu)
डोळे येणे याला दुसरा शब्द आय फ्लू (Eye Flu) असा आहे. अशा संसर्गाला डोळे लाल होणे, पिंक आय, कंजंक्टिवायटिस असे ही म्हणले जाते. पावसाळ्याच्या वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे आपल्याला सतत घाम येतो. हा घाम पुसत असताना आपला हात वारंवार डोळ्यांना देखील लागत असतो यामुळेच संसर्ग होतो आणि डोळे येतात.
डोळे येण्याची लक्षणे कोणती?
डोळे येण्यापूर्वी (Eye Flu) आपले डोळे हलकेसे लाल दिसू लागतात. सतत डोळ्यांवर तणाव येऊन त्यातून पाणी यायला लागते. डोळ्यांच्या हातून खाज सुटल्यासारखी वाटते तसेच टोचल्या सारखे देखील होते. डोळ्यात थोडा चिकटपणा जाणवतो. आपल्याला सतत डोळा चोळू वाटतो. काहीवेळा या संसर्ग मध्ये सर्दी, खोकला, ताप अशीही लक्षणे दिसून येतात. यातूनच आपल्याला डोळे येणार असल्याचे समजते.