नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल सगळेच जण सोशल मीडियाच्या व्यक्त होत असतात. सोशल मीडिया तर तरुणांच्या हक्काचे माध्यम बनले आहे. पण काही लोकांकडून याचा चुकीच्या कामासाठी वापर करतात. यामुळे अनेक जणांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियाचा चुकीचा वापर करत हैदोस घातला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह भाषेचा वापर करत अनेक महिला आणि मुलींना मानसिक त्रास दिला आहे. याप्रकरणी अनेकजणींनी वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील आरोपी हा गुजरातमधील रहिवाशी आहे. त्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातील मुलींशी आणि महिलांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत त्यांच्याशी आक्षेपार्ह असे वर्तन केले. या आरोपीने अत्यंत लज्जास्पद भाषेचा वापर करत महिला आणि मुलींची बदनामी करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी नागपूरात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता हा आरोपी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने संबंधित आरोपीला गुजरातमध्ये जावून अटक करणे शक्य नसल्याने नागपूर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या आरोपीचा शोध घेतला. तेव्हा हा आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी त्याला ताकीद देऊन सोडून दिले आहे. त्याच्याकडून माफीनामा लिहून घेऊन त्याची सुटका करण्यात आली आहे. सुटका केल्यानंतरदेखील त्याने मुलींना त्रास देणे सुरूच ठेवले आहे.
हा अल्पवयीन आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीनीशी ऑनलाईन संपर्क करायचा. त्यानंतर तो त्यांच्याशी घाणेरड्या भाषेत संवाद साधायचा. मुलींनी त्याच्यावर आक्षेप घेतला किंवा ब्लॉक केले तर तो स्वतःच्या आणि संबंधित मुलीच्या नावाने बनावट खाते उघडून तिच्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना अत्यंत अश्लील मेसेज पाठवून संबंधित मुलीची बदनामी करायचा. तसेच तो त्या मुलींना व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्ये करायचा. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गोष्टीचा पुढील तपास करण्यात येत आहे.