कोल्हापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. धनंजय महाडिक १ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे होणाऱ्या महाजनादेश यात्रेच्या समारोप प्रसंगी भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा अमित शहा यांच्या हस्ते प्रवेश घेतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.
२०१४ साली मोदी लाटेत सुद्धा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकण्याचा करिष्मा धनंजय महाडिक यांनी करून दा खवला होता. त्यांच्या या करिश्माची कदर पक्षाने ठेवली नाही म्हणून त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. धनंजय महाडिक भाजपमध्ये दाखल होताच त्यांना प्रदेश पातळीवर भाजपचे महत्वाचे पद देण्यात येईल अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान धनंजय महाडिक याचे पुनर्वसन कसे केले जाणार या बद्दल देखील लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मात्र याबद्दल काहीच खात्रीलायक माहिती अद्याप मिळू शकली नाही. धनंजय महाडिक यांच्या राष्ट्रवादी सोडल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगलेच खिंडार पडले आहे. त्यामुळे येत्या काळात त्याचे परिणाम कोल्हापूरच्या राजकारणात बघायला मिळणार आहेत.