बरेली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या मैत्रिणींसोबत स्कूटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच आरोपींनी पीडित तरुणीला आणि तिच्या मैत्रिणीला बेदम मारहाणदेखील केली. यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला एका अज्ञातस्थळी नेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी इज्जतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
31 मे रोजी पीडित तरुणी आपल्या स्कूटीवरून बाहेर फिरायला गेली होती. तेव्हा इज्जतनगर परिसरातील भगवानपूर धिमरी येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणीला थांबवले. यानंतर त्या मुलांनी या दोन्ही तरुणींना मारहाण केली. यानंतर आरोपींनी चाकूचा धाक दाखवत त्यांना मारण्याची धमकी दिली व पीडित मुलीचे अपहरण केले. यानंतर या पीडित तरुणीला अज्ञातस्थळी नेवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणी खूप घाबरली तिने आपल्या बाबत घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला नाही.
यानंतर तिने धाडस करून शनिवारी सगळा प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. हे सगळं ऐकून पीडित तरुणीच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबियांसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल करून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिक्षक रोहित सिंह सजवाण यांनी दिली आहे.