सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जगभर अनेक प्रकारच्या विषाणूजन्य साथीच्या रोगांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा साथीच्या विविध रोगांवर उपचार करण्यारे अनेक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागते. तसेच संसर्ग टाळण्यासाठी संबंधित आजारावर उपचार करताना डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालणे अनिवार्य आहे. मात्र असा पीपीई कीट सलग ६ – ६ तास घालून सेवा देणे डॉक्टरांसाठी मोठे त्रासाचे ठरते. कारण पूर्णपणे पॅकबंद असलेल्या पीपीई कीटमध्ये हवेचे योग्य संतुलन होत नसल्याने घामेजलेल्या अवस्थेत सेवासुश्रुषा करताना डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होते, तसे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
आरोग्य कर्मचाऱ्यांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या उपकरणाचे संशोधन करण्यात आले आहे. कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून संशोधित करण्यात आलेल्या या अनोख्या उपकरणामुळे पीपीई कीटमध्ये हवा खेळती राहणार असून, संबंधित पीपीई कीट परिधान करणाऱ्या डॉक्टरांच्या शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पीपीई कीटचा वापर त्यांच्यासाठी सुसह्य ठरणार आहे. मुख्य म्हणजे या उपकरणात 0.1 मायक्रॉन आकाराचा हेपा फिल्टर बसविण्यात आला आहे. कोविड-१९ चा विषाणू हा यापेक्षा मोठ्या आकाराचा असल्याने त्याचा शिरकाव या उपकरणाद्वारे पीपीई कीटमध्ये होऊ शकत नाही.
हे उपकरण वजनाला हलके असून, हाताळण्यास सोपे आहे. त्यामुळे डॉक्टरांसह नर्सेस, वॉर्ड बॉय व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना हे उपकरण आरामदायी पद्धतीने वापरता येणार असून, विषाणूजन्य साथीच्या आजारांच्या काळात उपचार करताना हे उपकरण त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेस भोसले यांनी सातत्याने समाजपयोगी संशोधनाला चालना दिली असून, आरोग्य क्षेत्रातील संशोधनाचा लाभ सामान्यातील सामान्य नागरिकाला व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाने विविध प्रकारची संशोधने केली असून, त्यांची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहेत. यापूर्वी कृष्णा विद्यापीठाने पर्यावरणपूरक अशा मास्कचे संशोधन केले आहे. तसेच वैद्यकीय उपकरणांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणाऱ्या युव्ही सेवक 360° या उपकरणाचे संशोधनही केले आहे. ज्यामुळे आता पीपीई कीट निर्जंतुकीकरण करून पुन्हा वापरणे शक्य झाले आहे.
पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या या उपकरणाच्या संशोधन आणि विकासासाठी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. विठ्ठल धूळखेड, डॉ. अर्चना गौतम, कराड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रमाकांत श्रीवास्तव, डॉ. सुहास देशमुख, संशोधक विद्यार्थी चारूदत्त जगताप, निखिल भिसे, अक्षय गावडे यांनी प्रयत्न केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.