हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिला दिवस हा टोलेबाजीचा रंगला. आज राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना चांगलेच टोले लगावले. त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. “जयंत पाटलांनी केलेल्या ‘आदिवासी असूनही चांगलं काम केलं’ या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रूजला आहे. सत्ता गेली पण माज जात नाही, अशी टीका पडळकर यांनी केली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसानंतर गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत जयंत पाटील यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, “जयंत पाटलांनी केलेल्या ‘आदिवासी असूनही चांगलं काम केलं’ या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रूजला आहे. मी तमाम दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहिर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही, अशी टीका ट्विटद्वारे पडळकरांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. यासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान, भाजपाचे नार्वेकर यांनी 166 सदस्यांचं बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले. यावेळी विरोधकांनी नार्वेकरांवरही निशाणा साधत त्यांनाही टोले लगावले.