मुंबई । गेवराई तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची दखल घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोफत टॅब उल्पब्ध करून देण्याबाबत, महाराष्ट्र पदवीधर संघटनेने पुढाकार घेत शासनाला विनंती केली होती. या पत्राची शासनाने त्वरित दखल घेतली आहे. कोरोना पार्श्वभूमीमुळे राज्यात प्रत्यक्ष शाळा महाविद्यालये सुरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.
गेवराई तालुक्यात अभिषेक संत या विद्यार्थ्याने आपल्या शेतकरी वडिलांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबची मागणी केली होती. मात्र खरीप हंगामाची पेरणी असल्याने पेरणीनंतर उचल घेऊन टॅब घेऊन देतो असे त्यांनी त्याला सांगितले. मात्र लगेच टॅब न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे गरीब तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी तात्काळ टॅब कुठून आणायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना टॅब घेणे शक्य नाही. म्हणूनच त्यांच्यासाठी मोफत टॅब द्यावेत अशी विनंती महाराष्ट्र पदवीधर संघटनेने मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सदर पत्राची दखल घेऊन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित खात्याकडे पाठवण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुजितकुमार थिटे आणि उपाध्यक्ष अमित कोळेकर यांनी दिली आहे.
गरीब तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत टॅब उपलब्ध करून दिल्यास त्यांनाही सहज ऑनलाईन शिक्षण घेता येईल. यासाठी अधिकृत योजना आखून विद्यार्थ्यांना टॅब द्यावेत अशी विनंती सरकारला करण्यात आली आहे. या मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे. त्यामुळे लवकरच यावर तोडगा काढून सर्वाना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य होणार असल्याचे चित्र दिसून येते आहे.