हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणं नाही. चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस आहे. त्यांना कोणतीही संस्था किंवा साधी सोसायटी चालवण्याचाही अनुभव नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या शिवाजी चौकातील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चंद्रकांत पाटील यांनी कधी कुठलीही संस्था काढलेली नाही, कुठलीही बँक किंवा कारखाना चालवलेला नाही, कुठलीही विकास सोसायटी किंवा मजूर सोसायटी चालवलेली नाही. टरबूज-खरबुज सोसायटी कधी काढली नाही. त्यांना ग्रामीण भागाच्या प्रश्नांशी काहीही देणघेणं नाही. नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाचा झंझावात आल्यामुळे त्यांना लॉटरी लागलेली आहे. ही गोष्ट पंढरपूरच्या मतदारांनी समजून घ्यावी. शेतकरी आणि गोरगरीबांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भगीरथ भालके यांना प्रचंड मताधिकाऱ्याने विधानसभेवर निवडून पाठवा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
या प्रचारसभेत अजित पवार यांनी पुन्हा एकदा ‘चंपा’ या संबोधनावरून चंद्रकांत पाटील यांना डिवचले. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसंच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो. हे कुणी जरी आले, तरी तुम्ही त्यांचं काहीही ऐकू नका. ते टिकाटिप्पणी करतील. पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन अजित पवार यांनी पंढरपूरच्या मतदारांना केले.