सांगली प्रतिनिधी । मिरज येथील रॉकेल डेपो झोपडपट्टी येथे राहणारी विवाहिता सोनम माने हिचा पती राहुल माने याने चारित्र्याच्या संशयावरून रात्री २ वाजण्याच्या सुमारास पत्नीच्या पोटात चाकूने भोसकून खून केला आहे. खून करून पती राहुल माने हा घटनास्थळावरून फरारी झाला आहे. या खूनाची गांधी चौकी पोलिसात नोंद झाली असून पोलिस आरोपी राहुल माने याचा शोध घेत आहेत.
सोनम व राहुल यांचा विवाह होवून अवघे १ वर्ष झाले आहे. लग्नानंतर काही दिवस त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर काहीतरी कारण काढून पती नेहमी पत्नी सोनम हिला वारंवार शिवीगाळ व मारहाण करीत होता. अनेकवेळा असा भांडणाचा प्रकार घडला होता. काल रात्री सोनम व पती राहुल यांचे चारित्र्याच्या संशयावरून जोरदार भांडणे झाली होती. ती भांडणे आजूबाजूच्या नागरीकांनी मिटविली होती. परत रात्री २ च्या सुमारास भांडणे सुरू झाल्यानंतर राहुल याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून पत्नी सोनम हिच्या पोटाच्या उजव्या बाजूस चाकूने भोसकले.
भोसकल्यानंतर राहुल हा तेथून फरार झाला. पोटात चाकू लागल्याने सोनम हिचा मोठ्याने ओरड्याचा आवाज आला. झोपडपट्टीतील सर्वजण त्यामुळे जागे झाले. सोनम हिच्या मावशीने तिला तात्काळ शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याची नोंद मिरज गांधी चौकी पोलिसात झाली असून फरारी आरोपी राहुल याचा पोलिस शोध घेत आहेत.