राजकीय चर्चांना उधाण : भाजप आ. जयकुमार गोरे जाहीर कबुली, मी अजितदादांचा फॅन

बारामती | अजित पवार यांची कार्यशैली, धाडस, धडाडी यांचा विचार करता मी त्यांचा चाहता आहे, भरसभेत हे सांगायला मला संकोच वाटत नाही, आमची राजकीय भूमिका काहीही असो, पण मी अजितदादा पवार  यांचा फॅन आहे, अशा शब्दांत भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादांवर स्तुतीसुमने उधळली. यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही जयकुमार गोरे यांना म्हणाले, “चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही येणाऱ्या काळात वेगळा विचार करा” असे म्हटल्याने पक्षप्रवेशाची आॅफर दिली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

बारामती येथील डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उद्घाटन अजित पवार यांनी केले. मात्र, वेळेपूर्वी तासभर येत उद्घाटन उरकून अजित पवार निघून गेले होते. जयकुमार गोरे व दत्तात्रय भरणे चार वाजता कार्यक्रमस्थळी पोहचले आणि आयोजकांनी त्यांनाही व्यासपीठावर येत बोलण्याचा आग्रह केला. यावेळी जयकुमार गोरे यांनी अजितदादांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.

त्यानंतर सभेत राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांना लगेचच राष्ट्रवादीच्या प्रवेशाचीच त्यांना ऑफर देऊन टाकली. बारामतीकरांनी हात दिला तर काहीही होऊ शकतो आणि गोरे यांच्याकडे पाहत भरणे म्हणाले, चुकतो तोच माणूस असतो, तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्ही येणाऱ्या काळात वेगळा विचार करा. त्याला चांगला विचार, असे भरणे यांनी शब्द वापरला.