Tuesday, June 6, 2023

मी दारुही पाजली नाही अन् पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले; 22 वर्षांच्या संध्याला ग्रामस्थांनी का मतदान केले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नायगाव जामखेड मधून निवडून आलेली २२ वर्षीय तरुणी संध्या सोनावणे राजकारणात पाऊल ठेवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी एक उदाहरण बनली आहे. कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांशिवाय ती तब्बल १२३ मतांनी निवडून आली आहे. मी दारुही वाटली नाही अन् मी पैसेही वाटले नाहीत पण मी निवडून आले असं सोनवणे यांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले. तिच्या या यशाच्या निमित्ताने हॅलो महाराष्ट्रने तिच्याशी संवाद साधला आहे. गावातील रस्ते, वीज, पाणी हे ऐरणीवर असणारे मुद्दे धरून त्यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी मारली. आणि केवळ विकासाच्या मुद्द्यांवर त्या  निवडून आल्या.

हॅलो महाराष्ट्राशी बोलत असताना संध्या म्हणाल्या की, मी जरी या गावची असले तरी माझे वास्तव्य फार काळ गावात नव्हते. पण केवळ माझ्या कामावर विश्वास ठेवून गावातल्या लोकांनी माझी निवड केली आहे. असे म्हणतात की, मटण आणि दारू शिवाय गावातली निवडणूक जिंकता येत नाही. मात्र अशा कोणत्याच प्रलोभनांच्या आहारी न जाता आमच्या गावातल्या लोकांनी मला मतदान केले. असे त्या सांगतात. निवडून आल्यानंतर गावातले वीज, पाणी आणि रस्ता हे महत्वाचे मुद्दे तर हाताळणार आहेच मात्र आरोग्य आणि शिक्षणाच्या मुद्द्यावरही काम करणार असल्याचे त्या सांगतात.

लोक मंदिरांची मागणी करतात मात्र आमच्या गावातल्या लोकांनी जिल्हा परिषदेच्या शाळाची मागणी केली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यांवर जास्त लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्या म्हणतात. याआधी गावात निवडून येणाऱ्या व्यक्ती ३०-३५ वर्षे काही करू शकल्या नाहीत म्हणून आता गावाने तरुणांवर विश्वास टाकला आहे. मागची सर्व कामे पूर्ण करण्यावर भर देत गावाला विकासाच्या वाटेवर नेण्याची जिद्द संध्या यांनी ठेवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.