हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे असा आरोप देशभरातील विरोधकांकडून मोदी सरकारवर केला जातोय. त्याच दरम्यान, केंद्र गृहमंत्री यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता असा खुलासा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मोदी सरकार विरोधकांना टार्गेट करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग करत आहे का असा प्रश्न अमित शाह यांना या कार्यक्रमात करण्यात आला. यावर उत्तर देताना अमित शाह यांनी हा गौप्यस्फोट केला. जेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी एका कथित बनावट चकमक प्रकरणात त्यांना अडकवण्यासाठी सीबीआय माझ्यावर दबाव आणत होती. त्यावेळी केंद्रात युपीए सरकार होत असं अमित शाह म्हणाले. तुम्ही टेन्शन घेऊन नका,नरेंद्र मोदींचं नाव सांगून टाका असं त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं. यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता असा खुलासा अमित शाह यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फ़ोटावर काँग्रेस काय प्रत्युत्तर देणार हे सुद्धा आता पाहावं लागेल.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवरही अमित शाह यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सभागृहाचे सदस्यत्व गमावलेले राहुल गांधी हे एकमेव नेते नाहीत. त्यांच्या आधी 17 खासदारांनी सदस्यत्व गमावले, त्यावेळी लोकशाही धोक्यात आली नाही का? असा सवाल अमित शाह यांनी केला. याप्रकरणी हायकोर्टात जाण्याऐवजी राहुल गांधी मोदींना दोष देत आहेत. त्यांनी शिक्षेला स्थगिती देण्यासाठी कोर्टात अपील केलेले नाही. हा कसला अहंकार? त्यामुळे राहुल गांधींनी मोदींवर आरोप करण्यापेक्षा उच्च न्यायालयात जावे असा सल्ला अमित शाह यांनी दिला.