हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या तरी आम्ही ठाकरे गटासोबत युती करण्यास इच्छुक आहोत. त्यामुळे शिंदे गटासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. परंतु जर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपची साथ सोडली तर मात्र त्यांच्यासोबत युतीबाबत चर्चा होऊ शकते असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. काल रात्री आंबेडकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीमुळे प्रकाश आंबेडकर शिंदे गटासोबत जाणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर उत्तर देताना त्यांनी वरील विधान केलं आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याशी भेटीगाठी होतच राहील. पण प्रत्येक भेट राजकीयच असतील असा संबंध बांधणं चुकीचे आहे. एकनाथ शिंदे यांनी जर भाजपला सोडलं तरच आमच्यात अशा प्रकारची चर्चा होऊ शकते अन्यथा नाही. ज्या पक्षांसोबत भाजपची युती आहे. त्या पक्षांसोबत आम्ही जाणार नाही ही आमची भूमिका जगजाहीर आहे. कारण आमचं भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत तात्त्विक भांडण आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीची आमची इच्छा आहे. मी त्यांना तसा प्रस्ताव सुद्धा दिला आहे की, पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करू. पण ते कधी जाहीर करायचं ते उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. आमची युती झाली पण पब्लिक कमिटमेंट नाही झाली. चार भिंतीमध्ये युती कधी जाहीर करायची हे आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचं आहे असेही त्यांनी म्हंटल