राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा! राज्यपालांच्या भेटीनंतर नारायण राणेंची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांचा राजभवनाला भेटी देण्याचा सिलसिला सुरुच आहे. आज सकाळची शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आज दुपारी नारायण राणेंनी राजभवनाला हजेरी लावली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करून नारायण राणे थेट प्रसार माध्यमांना सामोरे गेले. यावेळी कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली राज्यातील आणि मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झालं आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी या सरकारकडे कोणतीही उपाययोजना नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.

मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. मुंबई महापालिका प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव आहे. त्यामुळे सर्व वैद्यकीय सेवा, रूग्णालय लष्कराच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत नारायण राणे यांनी मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. राज्यपालांनी परिस्थिती हाताळण्यासाठी सूचना द्याव्यात. राज्यातील सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट राज्यात लागू करावी, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

राज्यात अनेकांनी उपासमार होत नाहीत. रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. ही परिस्थिती सरकारला हाताळता आलेली नाही, असा आरोप नारायण राणेंनी केला. राज्याला आतापर्यंत केंद्र सरकारने भरपूर मदत केली. मात्र तरीही राज्यातील नेते केंद्र सरकारवर नुसती टीका करत आहेत. सरकारी यंत्रणा कशी हाताळावी हे ज्यांना कळतं त्यांनी करावं, मात्र तसं केलं जात नाही. नाचता येईना, अंगण वाकडे अशी महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती आहे, असा टोला नारायण राणेंनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment