राष्ट्रवादीच्या कपाटातून ‘ती’ महत्त्वाची कागदपत्रे गहाळ; जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक खुलासा

jitendra awhad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. परंतु या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे, पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर हे कागदपत्रे गहाळ झाल्याची कबुली शरद पवार (Sharad Pawa) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर, या सर्व प्रकरणानंतर पक्ष म्हणून अद्याप कोणतेही कारवाई करण्यात आली नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

आजच्या सुनावणीवेळी जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर काही महत्त्वाचे पुरावे कपाटात ठेवण्यात आले होते. परंतु ते गायब झाले आहेत. दोन जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्यावर कपाट रिकामा केला. तेव्हा कागदपत्रांमध्ये ते काय घेऊन गेले हे आम्हाला माहीत नाही. संबंधित माणसे पक्ष सोडून गेले आहेत आणि त्यांनी या पुरव्यांचे नेमके काय केले, हे देखील माहीत नाही”

महत्त्वाचे म्हणजे, या मोठ्या खुलाश्यानंतर अजित पवार गटाकडून या संबंधित तपशील घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच, कागदपत्रे गहाळ झाल्यानंतर कारवाई का करण्यात आली नाही? या पत्रांवर सही करण्याचा अधिकार कोणाला होता? असे प्रश्न सुनावणीवेळी विचारण्यात आले. यावर उत्तर देत मला सही करण्याचा कोणताही अधिकार नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. आता या सगळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयातून कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे पक्षाच्या अंतर्गत कामांवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.