मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांचा कार्यकाळ यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत आहे. यानंतरही शास्त्रीच टीम इंडियाचे कोच राहतील का? याबाबत अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड याची टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तेव्हापासूनच द्रविड टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. प्रशिक्षकपदाच्या या मुद्द्यावर भारताचा माजी ऑलराऊंडर रितेंदर सिंग सोदी याने प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने नोव्हेंबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप जिंकला तरी रवी शास्त्रींना प्रशिक्षकपदावरून हटवणे अशक्य आहे असे रितेंदर सिंग सोदी म्हणाला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ जर नोव्हेंबर महिन्यात संपला, तर शास्त्रींच्या पदाला हात लावला जाणार नाही, असे मत रितेंदर सिंग सोदीने मांडले आहे. भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती, यानंतर टीम इंडियाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही.
रितेंदर सिंग सोदी म्हणाले, ‘आयसीसी ट्रॉफी विजय पाहून प्रशिक्षक किती यशस्वी आहे, ते पाहणं योग्य नाही. रवीने चांगली कामगिरी केली नाही, असे बोलणे कठीण आहे. प्रशिक्षक म्हणून त्याने चांगले काम केले आहे. भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकला तर त्याला प्रशिक्षकपदावरून काढणे अशक्य आहे. ‘रवी शास्त्री प्रशिक्षक असताना भारताचा 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. तर भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत पराभव करत दोन वेळा टेस्ट सीरिजमध्ये विजय मिळवला, तेव्हा शास्त्रीच टीम इंडियाचे प्रशिक्षक होते.