Saturday, June 3, 2023

केवळ इंश्युरन्स मिळविण्यासाठी लक्षणे नसलेलेही रूग्णालयात, तपासणीसाठी आता समिती गठीत

औरंगाबाद | शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना काही रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केवळ इंश्युरन्स मिळविण्यासाठी लक्षणे नसतानाही रूग्णालयात भरती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकाराने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रूग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला. यात कुठल्याही प्रकारची लक्षणे नसलेले व ठणठणीत असलेले रूग्ण घाटीसह खासगी रूग्णालयात दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक म्हणजे धनाढ्य लोक पैशाच्या जोरावर तसेच काही जण सेटिंग करून रूग्णालयात जागा मिळवत आहेत. तर काही जण केवळ काढलेल्या इंश्युरन्सचे पैसे मिळावेत, याकरिता खासगी रूग्णालयात दाखल होत आहेत. खुद्द पाण्डेय यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये याचा उल्लेख केला आहे.

शहरातील एमजीएम, धूत, हेडगेवार, वायएसके आदी रूग्णालयांत समिती गठीत करण्यात आली आहे. यात डॉक्टर्स तसेच अधिकाºयांचा समावेश आहे. संबंधित समिती त्या रूग्णालयांची तपासणी करेल, जर त्यात असा प्रकार आढळून आला तर संबंधित रूग्णालयांवर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील पाण्डेय यांनी दिला आहे.