INDIA आघाडीकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; 2024 ला मोठी उलथापालथ होणार??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅगने काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचे 7 घोटाळे बाहेर काढले होते. परंतु यातील बहुतांश घोटाळे हे मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विभागाचे असलयाने केंद्र सरकार कडूनच गडकरी याना संपवण्यासाठी हे सगळं चाललं असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी गडकरींची पाठराखण करत त्यांना विरोधकांच्या INDIA आघाडीत येण्याचे आवाहन केलं आहे. तसेच जर गडकरी INDIA आघाडीत आल्यास त्यांना पंतप्रधान करू असेही विनायक राऊत यांनी म्हंटल आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना विनायक राऊत म्हणाले, महाराष्ट्राचं एक नेतृत्व लोकप्रिय होत आहे. उद्या ते पंतप्रधानपदाचे दावेदार होतील म्हणून नतद्रष्ट दिल्लीच्या राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा कट आखला आहे. हा कट उधळून लावण्याचं काम महाराष्ट्र करेन. आमची नितीन गडकरींना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसाचं पाणी दिल्लीतील लोकांना दाखवावं. कशाला घाबरता त्याला, तुम्ही फक्त आवाज द्या. तुम्ही INDIA आघाडीत या, तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे विनायक राऊत यांनी म्हंटल.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा कॅगच्या अहवालानंतर शंका उपस्थित केली होती. नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठी आणि त्यांचे राजकारण संपवण्यासाठीच सरकार कडून प्रयत्न सुरु आहेत असं त्यांनी म्हंटल होते. त्यातच आता ठाकरे गटाने गडकरी याना थेट INDIA आघाडीत येऊन पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.