मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताने काही दिवसांपूर्वी WTC फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाच्या निवडीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने आपले मत मांडले आहे. या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाने एक मजबूत संघाची निवड केली आहे. यामध्ये भारताचा फक्त एकच निर्णय चुकला. या संघामध्ये मनगटाने चेंडू वळवणाऱ्या फिरकीपटूचा समावेश करण्यात आला नाही.
इंग्लंडमधील वातावरण लेग स्पिनरसाठी अनुकूल असते. भारताकडे आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा सारखे फिरकीपटू आहेत पण भारताकडे मनगटाने चेंडू फिरवणारा एकही गोलंदाज नाही आहे. इंग्लंडमध्ये जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तेथील वातावरण थंड स्वरूपाचे असते. मी तेथे भरपूर क्रिकेट खेळलो आहे. असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया म्हणाला आहे. इंग्लंडमध्ये जेव्हा सामन्याला सुरूवात होते तेव्हा विकेटवर सूर्यप्रकाश असतो. तसेच विकेटवर आर्द्रता असते. येथील वातावरण जलद गोलंदाजांसोबत फिरकीपटू विशेषत: लेग स्पिनरला उपयुक्त आहे. यामुळेच भारतीय संघात कोणीच लेग स्पिनर नाही हा थोडा काळजीचा विषय आहे.
राहुल चहरचे केले कौतुक
पाकिस्तानकडून फिरकीपटू म्हणून दानिश कनेरिया याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. तसेच दानिश कनेरिया याने भारताचा फिरकीपटू राहुल चहर याचे कौतुक केले आहे. त्याची सध्याची गोलंदाजी आणि फॉर्म बघता त्याची या संघात निवड व्हायला हवी होती. न्यूझीलंडकडे इश सोढी याच्या सारखा तगडा लेग स्पिनर आहे. विराट कोहली देखील लेग स्पिनर विरुद्ध खेळताना अडखळतो. तसेच राहुल चहर गुगली, फ्लिपर आणि लेग स्पिन उत्तम प्रकार टाकतो.